पुढारी ऑनलाईन डेस्क : संपूर्ण देशाला कोरोना लस पुरवठा केला जाईल इतकी क्षमता सरकारकडे नाही. तिसरी लाट आल्यास त्याचे परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतील. कोरोना लस पुरवठ्याबाबत दुजाभाव केला जात असल्याचा आरोप नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी केला.
पश्चिम बंगाल सरकारनं अभिजीत बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली ग्लोबल ॲडवायजरी बोर्डाची नियुक्ती केली आहे.
या समितीची आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
भारतातील दुसरी लाट आता ओसरत आहे. मात्र, केंद्र सरकारने निश्चित केलेले लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी अजूनही पुरेशी तयारी नाही.
अनेक बिगर भाजप राज्यांना लसींचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नाही.
महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश होत आहे, असा आरोप वारंवार केला जात आहे.
आज पश्चिम बंगालमध्ये झालेल्या बैठकीत अभिजित बॅनर्जी यांनी कोरोना लस पुरवठा, देशाची लसीकरण मोहीम आणि केंद्र सरकारचे अपयश यावर परखड भूमिका मांडली.
ते म्हणाले, 'लसीकरणाबाबत सर्वात मोठी समस्या ही आहे ती म्हणजे लशीचा तुटवडा.
केंद्र सरकार संपूर्ण देशाला पुरेसा ठरेल इतक्या लशींचे उत्पादन आणि पुरवठा करू शकत नाही.
जर लसींचा पुरेसा साठा आणि उत्पादन असते तर लस तुटवड्यासंदर्भात सध्या होत असलेल्या तक्रारी झाल्या नसत्या.
आज संपूर्ण देशातच कोरोना लस पुरवठा करण्याबाबत संभ्रम आहे. सांगितले जाते एक आणि वस्तुस्थिती वेगळीच असते.'
गैरभाजप राज्यांतील लसीच्या पुरवठ्यातील असमानतेबाबत बोलताना ते म्हणाले, 'गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांना मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करून दिली जात आहे.
मात्र, गैरभाजप राज्यातील नागरिकांना लस देण्याबाबत मात्र, केंद्र सरकार उदासीन आहे.
पश्चिम बंगालला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिदिन कमी लस पुरवठा होत आहे.
माझी केंद्र सरकारला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन आहे, की त्यांनी राज्यांमध्ये भेदभाव करू नये.'
हेही वाचा:
पहा व्हिडिओ: राष्ट्रीय चरित्र घडविण्यासाठी आजही शिवचरित्र आवश्यक