रवी कुमार दहिया : पैलवान होणं सोपं नव्हतं; आईला अश्रू अनावर

रवी कुमार दहिया
रवी कुमार दहिया
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : रवी कुमार दहिया : टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाने हुलकावणी दिल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागणाऱ्या रवी कुमार दहिया याची कहानीही तितक्याच संघर्षाची आहे. २३ वर्षांच्या रवि दहिया याने १२ व्या वर्षापासून कठोर मेहनत घेतली. वडिलांनी दिवसाला १५ किलोमीटरची पायपीट करून खुराक पोहोचवला.

आज रवीचे यश दिसत असले तरी त्यामागे त्याच्यासह कुटुंबाची मोठी संघर्षकथा आहे.

रवि ने पदक जिंकताच त्याच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ' असाच कुणी पैलवान बनत नाही. त्यामागे मोठी साधना आहे.' असे सांगता सांगता त्या रडू लागल्या.

सोनिपतमधील रविला त्याच्या वडिलांनी १२ व्या वर्षी दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये दाखल केले.

महाबली सतपाल यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करत होतो. रविचे वडील शेतकरी आहेत.

आज रविने मेडल जिंकल्यामुळे तो पोस्टर बॉय बनला आहे. मात्र, इथवरचा त्याचा प्रवास संघर्षाने भरलेला आहे.

छत्रसाल स्टेडियमध्ये शिकला डावपेच

२३ वर्षीय रवि स्वाभावाने शांत आणि लाजरा आहे. १२ व्या वर्षी त्याच्या वडिलांनी त्याला छत्रसाल स्टेडियममध्ये दाखल केले.

महाबली सतपाल आणि प्रशिक्षक वीरेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा सराव सुरू होता.

छत्रसाल स्टेडियमने सुशीलकुमार आणि योगेश्वर दत्त हे दोन ऑलिम्पिकवीर दिले आहेत.

आईला रोखता येईनात आनंदाश्रू

हार जीत ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. मात्र, शांत चित्ताने खेळत राहणे ही रविची खासियत आहे. सेमीफायनल जिंकल्यानंतर ना त्याने जल्लोष केला ना हरल्यानंतर दु:ख व्यक्त केले.

मात्र, त्याचे कुटुंबीय खूप नाराज झाले. त्यांना अश्रू अनावर झाले. एका खासगी टीव्ही चॅनेलला मुलाखत देताना रविच्या आईने अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

एक महिन्यापासून त्यांच्याशी बोलणे झाले नाही. तो असाच तयार झाला नाही, असे सांगताना त्या भावूक झाल्या.

वडील दररोज करत होते ६० किलोमीटरचा प्रवास

रविला पैलवान करायचे या ध्येयाने त्याच्या वडिलांनी खूप मेहनत घेतली. आपल्या सगळ्या अडीअडचणींवर मात करून मुलाच्या तयारीत त्यांनी कुठलीच कसर ठेवली नाही.

ते दररोज आपल्या गावातून छत्रसाल स्टेडियमवर जात होते. हे अंतर जवळपास ६० किलोमीटरचे आहे. ते रोज साडेतीनला उठत असत.

त्यानंतर दूध, तूप आणि दही घेऊन घरापासून पाच किलोमीटर चालत जाऊन जवळच्या रेल्वे स्टेशनवर जात होते.

तेथून आजादपूरला जात. त्यानंतर पुन्हा दोन किलोमीटर चालून छत्रसाल स्टेडियमवर जात. परत येऊन दिवसभर शेतातील कामे करत असत.

१२ वर्षे त्याच्या वडिलांचा हा दीनक्रम होता. मात्र, कोरोना काळात याला ब्रेक लागला. रविने आता पदक कमावल्यानंतर हा सगळा त्रास त्याचे वडील विसरून गेले.

पदक घेणारा गावातला तिसरा मल्ल

२३ वर्षीय रवि हरियाणातील सोनीपतमधील नाहरी गावचा रहिवाशी आहे. १९८० च्या मास्को ऑलिम्पिक आणि लॉस एंजलिस ऑलिम्पिक स्पर्धेत महावीर सिंह यांनी,

२०१२ च्या लंडन ऑलिम्पिमध्ये अमित दहिया यांनी पदक मिळविले होते. १५ हजार लोकसंख्या असलेल्या या गावात वीजदेखील नीट नाही.

या गावात केवळ एक जनावरांचा दवाखाना आहे. येथे ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे ना, पायाभूत सुविधा.

तरीही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत रविने देशासाठी पदक पटकावले आहे.

हेही वाचा :

पहा व्हिडिओ: अपघातग्रस्तांची जीवनरक्षक

https://youtu.be/fYQekIndfJw

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news