'माझ्या नवऱ्याला...!' हल्ल्यातील मृताच्या पत्नीने सरकारकडे केली 'ही' मागणी File Photo
राष्ट्रीय

Pahalgam Terror Attack | 'माझ्या नवऱ्याला...!' हल्ल्यातील मृताच्या पत्नीने सरकारकडे केली 'ही' मागणी

दहशतवाद्यांनी माझ्या शुभमवर पहिली गोळी झाडली

मोनिका क्षीरसागर

लखनौ : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना जीव गमवावा लागला. दहशतवाद्यांनी नवविवाहित जोडप्यांनाही सोडले नाही. या हल्ल्यामुळे अनेक महिलांचे संसार मोडले त्यांची कुटुंबं देखील उद्ध्वस्थ झाली. या दहशतवादी हल्ल्यात उत्तर प्रदेशातील कानपूर येथील रहिवासी शुभम द्विवेदी यांनाही आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या पत्नी आशान्या यांनी केंद्र सरकारकडे एक अनोखी मागणी केली आहे.

दहशतवाद्यांनी शुभमवर पहिली गोळी झाडली

आशान्या यांनी म्हटले आहे की, दहशतवाद्यांनी शुभमवर पहिली गोळी झाडली. दहशतवाद्यांशी झालेल्या वादादरम्यान, अनेकांना तेथून पळून जाण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. आणि आता, त्यांची पत्नी आशान्या हिने तिच्या पतीला 'शहीद'चा दर्जा देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.

आशान्या काय म्हणाल्या ?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आशान्या म्हणाल्या की, "शुभम अभिमानाने स्वतःला हिंदू म्हणवत असे आणि त्याने अनेक लोकांचे प्राण वाचवले. पहिली गोळी माझ्या पतीला लागली. दहशतवादी त्याला त्याच्या धर्माबद्दल विचारत होते. या वादाला थोडा वेळ लागला, ज्यामुळे लोकांना तेथून पळून जाण्यास मदत झाली. त्यामुळे मला सरकारकडून दुसरे काहीही नको आहे. माझ्या नवऱ्याला 'शहीद'चा दर्जा द्या. जर सरकारने माझी विनंती मान्य केली तर मला जगण्याचे कारण मिळेल.

१२ फेब्रुवारीला झाला होता विवाह

२२ एप्रिल रोजी बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी ३१ वर्षीय शुभम द्विवेदी यांना गोळ्या घालून ठार मारले. कानपूरचे रहिवासी शुभम आणि आशान्या यांचे लग्न १२ फेब्रुवारी, २०२५ रोजी झाले होते. दोघेही सुट्टी साजरी करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरला गेले होते. पण बैसरन खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्यात आशान्याचे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त झाले.

दहशतवाद्यांनी मला नाही मारले : आशान्या

आशान्या अद्याप या अपघातातून पूर्णपणे सावरलेल्या नाहीत. त्या घटनेची आठवण करून देताना आशान्या सांगतात की, आम्ही बैसरन व्हॅलीमध्ये बसून मॅगी खात होतो. तेवढ्यात मागून लष्करी गणवेशातील एक माणूस आला आणि त्याने आम्हाला विचारले की, ' तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम? ' आम्हाला वाटलं कदाचित कोणीतरी मस्करी करत असेल. मी म्हणालो का भाऊ, काय झालं? यावर त्याने पुन्हा तेच विचारले, ' तू हिंदू आहेस की मुस्लिम? ' आम्ही 'हिंदू' म्हटले आणि त्याने शुभमच्या डोक्यात गोळी झाडली. हे सर्व इतके लवकर घडले की मला काहीच समजले नाही.

तासाभरानंतर लष्कराचे सैन्य आले

तिच्या पतीच्या मृत्यूनंतर, आशान्याने दहशतवाद्यांना विनंती केली की, जर त्यांनी तिच्या पतीला मारले असेल तर त्यांनी तिलाही मारावे. पण दहशतवाद्यांनी तसे करण्यास नकार दिला. दहशतवाद्यांनी सांगितले की, 'ते आम्हाला मारणार नाहीत. आम्ही तुम्हाला जिवंत सोडत आहोत जेणेकरून तुम्ही जाऊन सरकारला आम्ही काय केले आहे ते सांगू शकाल'.

२६ जणांना आपला जीव गमवावा लागला

शुभमचे वडील संजय द्विवेदी म्हणाले की, बैसरन खोऱ्यात सुरक्षा दल तैनात नव्हते. घटनेच्या एक तासानंतर सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, दहशतवाद्यांनी २६ जणांना ठार मारले आणि तेथून पळून गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT