

Pahalgam Attack |
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या तिन्ही संरक्षण दलांनी युद्ध सरावाद्वारे आपली ताकद दाखवण्यास सुरूवात केली आहे. आज अरबी समुद्रात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या युद्धनौकांनी भव्य शक्तीप्रदर्शन करत जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण केले.
भारतीय नौदलाच्या जहाजांनी लांब पल्ल्याच्या अचूक आक्रमणासाठी आणि युद्धसज्जतेची चाचणी घेण्यासाठी विविध जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचे परिक्षण केले. प्लॅटफॉर्म, प्रणाली आणि कर्मचाऱ्यांची तयारीची पडताळणी केली. भारतीय नौदल देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी आणि कधीही, कुठेही, कसेही, युद्धासाठी सज्ज आहे, असे भारतीय नौदलाने म्हटले आहे.
यापूर्वी, भारतीय नौदलाने अरबी समुद्रात स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत तैनात केली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा एक धोरणात्मक संकेत मानला जात आहे. २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ही तैनाती करण्यात आली आहे. 'एक्स' वर पोस्ट केलेल्या उपग्रह प्रतिमांमध्ये 'विक्रांत' अरबी समुद्रात जाताना दिसत आहे.