

जम्मू-काश्मीर : PahalgamTerroristAttack | काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथील बैसरन येथे मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात परदेशी नागरिकांसह भारतीय नागरिक मारले गेले. या दहशतवादी हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झालेत. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी आयबी अधिकारी मनीष रंजन यांना त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसमोर गोळ्या घालून ठार मारले. अचानक झालेल्या हल्ल्यातून मनीष रंजन सावरू शकले नाही, असे वृत्त समोर आले आहे.
दहशतवादी लष्कराचा गणवेश घालून आले होते. म्हणूनच पहलगामच्या बैसरन येथे सुट्टी घालवण्यासाठी आलेल्या पर्यटकांना कोणताही संशय आला नाही. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी भारताच्या गुप्तचर संस्थेचे अधिकारी मनीष रंजन यांनाही गोळ्या घातल्या. या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मनीष रंजन हे हैदराबादमधील आयबी कार्यालयात सेक्शन ऑफिसर म्हणून काम करत होते. ते मूळचे बिहारचे रहिवासी होते. ते त्याच्या कुटुंबासह जम्मू-काश्मीरमधील पहलगामला भेट देण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्याची पत्नी आणि मुलगीही होती. दहशतवादी भारतीय लष्कराचा गणवेशात होते, म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यटकांना लक्ष्य करू शकले. या हल्ल्यात मनीष रंजन यांची पत्नी आणि त्यांची दोन्ही मुले सुरक्षित आहेत.
कश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी (दि.२२) दुपारच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात ३० पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले. यामागे 'लष्कर-ए-तैयबा'च्या 'TRF' गटाचा हात असल्याची माहिती समोर आली आहे.