

Bollywood strongly condemned the Pahalgam incident
पुढारी ऑनलाईन :
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवाद्यांनी पर्यटनासाठी आलेल्या निष्पाप नागरिकांना बंदूकीतून गोळ्या झाडून ठार केले. यामध्ये २६ लोकांचा जीव गेला. या घटनेने संपूर्ण देश हादरून तर गेलाच शिवाय देशभरात संतापाची लाट उसळली आहे. चित्रपट क्षेत्रातील कलाकारांनीही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनीही पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
त्यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला. 'जेलन २' चे चित्रिकरण पूर्ण करून ते चैन्नई विमानतळावर पोहोचले, तिथे माध्यमांशी बोलताना त्यांनी काश्मीरमध्ये असलेली शांतता भंग करण्यासाठी जाणूनबुजून शत्रूने केलेला हा एक प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याची निषेध करताना त्यांनी शत्रू हा जाणूनबुजून काश्मीर अशांत करण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारने यातील दोषींना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, जी कल्पनेच्याही पलिकडची असेल. रजनीकांत यांची ही प्रतिक्रिया सुरेश बालाजी नावाच्या एका यूजरने त्याच्या 'एक्स' वरून शेअर केली आहे.
स्वत:ला रजनीकांत यांचा चाहता सांगणाऱ्या सुरेश बालाजीने सुपरस्टार रजनीकांत यांचा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे की, थलाइवा रजनीकांत यांनी चैन्नईत पोहोचल्यावर माध्यमांशी बोलताना पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. तसेच हल्ल्यातील दोषींना कठोर शासन करण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी केली. भारताने अशी कारवाई करावी की दहशतवाद्यांनी भारताकडे पुन्हा तिरक्या नजरेने बघण्याची हिंमत करू नये.
बॉलीवूडमधील कलाकारांनीही या घटनेचा निषेध करून या घटनेला भ्याड हल्ला म्हटले आहे. बॉलीवूडच्या तिन्ही खान मंडळी म्हणजेच शाहरूख खान, अमिर खान आणि सलमान खान यांनी या हल्ल्यावर दु:ख व्यक्त केले आहे. तसेच या घटनेचा निषेध नोंदवलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दहशतवादी भयाड हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि जगाला एक संदेश दिला की, भारत या घटनेतील प्रत्येक दहशतवादी, त्यांचे हँडलर्स आणि समर्थकांना ट्रॅक करून कडक कारवाई करेल.