पहलगाममधील बैसरण व्हॅलीचे छायाचित्र Pudhari Photo
राष्ट्रीय

Pahalgam terrorist attack | पहलगामच्या बैसरणलाच दहशतवाद्यांनी लक्ष्य का केलं?

खडतर भूभाग, सुरक्षा व्यवस्था नसणे ही ठरतायत मुख्य कारणं!

मोनिका क्षीरसागर

Terrorists choose Baisaran Valley

श्रीनगर : काश्मीरमधील “मिनी स्वित्झर्लंड” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगामच्या बैसरण व्हॅलीत मंगळवारी (दि.२४) पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी घडवलेल्या प्राणघातक हल्ल्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

या हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी बैसरणची निवड का केली, याचं उत्तर त्या परिसराच्या भूगोलात दडलं आहे. 'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तात येथील नकाशे आणि प्रत्यक्ष चित्रफितीद्वारे याचे विश्लेषण करण्यात आले आहे.

बैसरणला कोणतेही वाहन पोहचू शकत नाही

बैसरण हे पहलगामच्या आग्नेय दिशेला असलेलं गवताळ पठार आहे. इथे पोहोचण्यासाठी नागमोडी चढाव असलेला ट्रेक मार्ग आहे. जो झऱ्यांतून, दाट जंगलातून आणि चिखलाट रस्त्यांमधून जातो. हा मार्ग वाहनांसाठी अनुपयुक्त आहे आणि काही ठिकाणी अतिशय घसरणारा आहे.

असा करावा लागतोय बैसरणपर्यंतचा जीवघेणा प्रवास

पहलगामहून बैसरणपर्यंत पायी किंवा घोड्यावरूनच प्रवास केला जातो. काही पर्यटक एटीव्हीचा वापर करतात, पण या भागात ते अजून व्यावसायिकरित्या उपलब्ध नाही. या ५.५ कि.मी. अंतरासाठी सुदृढ तरुणालाही जवळपास एक तास लागतो. बैसरण चारही बाजूंनी खोल दऱ्यांनी वेढलेलं असून, अधिकृत ट्रेक मार्गाशिवाय इतर कुठूनही तिथं पोहोचणं अशक्य आहे.

बैसरणला दररोज शेकडो पर्यटक भेट देतात तरीही....

स्थानिक व्यापारी काही सुरुवातीचा टप्पा दुचाकीवर पार करतात, पण तो मार्गही पक्का नाही. इतक्या अवघड भूभागामुळे, कोणतीही आपत्कालीन सेवा किंवा सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी पोहोचायला किमान ३०-४० मिनिटं लागतात. दररोज शेकडो पर्यटक बैसरणला भेट देतात, तरीही या मार्गावर कोणतीही पोलीस तुकडी तैनात नव्हती, हे 'इंडिया टुडे'च्या वृत्तांकामध्ये स्पष्ट सांगण्यात आले आहे.

हल्ला करण्यापूर्वीच दहशतवादी होते तयारीत

सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाच्या 'द रेसिस्टन्स फ्रंट' (TRF) या गटाशी संबंधित दहशतवाद्यांनी स्थानिक सहाय्यकांच्या मदतीने परिसराची रेकी केली होती. ते घनदाट जंगलात लपण्यासाठी ठिकाणं तयार करत होते आणि हल्ल्याच्या वेळी त्यांनी बॉडी कॅमेरेही घातले होते. १९९० नंतर पर्यटकांवर हल्ले दुर्मीळ असतानाही, या घटनेमुळे पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT