

कुडाळ : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी क्रूर आणि अमानुष हल्ल्यात निरपराध पर्यटक आणि स्थानिक नागरिकांचा बळी गेला, याबद्दल आम्ही तीव्र निषेध करत आहोत, अशा घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने कडक पावले उचलावीत व संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुस्लीम समाजातर्फे बुधवारी कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या मार्फत राज्य व केंद्र शासनाकडे पाठविण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे, अशा हिंसक आणि मानवी मूल्यांना काळिमा फासणार्या कृत्यांचे कोणत्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही. आमचा समाज नेहमीच शांतता, सद्भाव आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या बाजूने उभा राहिला आहे व यापुढेही राहील. दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या निर्दोष नागरिकां बद्दल आमच्या मुस्लीम समाजातर्फे तीव्र शोक व्यक्त करत आहोत आणि या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. हा हल्ला अत्यंत भ्याड, अमानवी आणि देशाच्या शांततेस बाधा आणणारा आहे. भारताचे नागरिक म्हणून आम्ही सर्वधर्मीय लोक एकत्र आहोत आणि अशा हिंसक कृत्य करणा-याना कठोर शासन व्हायला हवे.
या पत्राद्वारे आम्ही प्रशासनाच्या व सरकारच्या योग्य ती कारवाई करण्याच्या निर्णयास आमचा पूर्ण पाठिंबा दर्शवितो. आम्ही भारतीय मुस्लीम समाज या देशाच्या एकतेच्या बाजूने उभा आहे आणि अशा घटनांचा तीव्र निषेध करतो. तसेच, आम्ही तहसीलदार यांच्यामार्फत राज्य व केंद्र शासनापाशी मागणी करतो की अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक पावले उचलावीत व संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आल्याची माहीती मुस्लीम समाजातर्फे देण्यात आली. यावेळी जिल्हा मुस्लीम समाजाचे मुश्ताक शेख, नाझीम मुकादम, सरफराज मुकादम, सरफराज नाईक, एजाज नाईक, जावेद नाईक, फारूक दोस्ती, जहेन शेख, मुबीन दोस्ती, डॉ.मुजफ्फर आवटे, नियाज शहा आदी उपस्थित होते.