Pahalgam Attack: भारत बदला घेणार; सरकार पुन्हा सर्जिकल स्ट्राईकच्या तयारीत, चोख प्रत्युत्तरास तिन्ही सैन्य दल सज्ज

कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत निर्णय; देशातील पर्यटनस्थळांवर आणि प्रमुख शहरांमध्येही सुरक्षा कडक करण्याचे निर्देश
CCS Meeting on Pahalgam Attack AT PM Modi's Residence
CCS Meeting on Pahalgam Attack AT PM Modi's Residence x
Published on
Updated on

CCS Meeting on Pahalgam Attack AT PM Modi's Residence

नवी दिल्ली ः काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यानंतर, भारत सरकारने आता दहशतवाद्यांना मुळापासून उखडून टाकण्याचा निर्धार केला आहे.

दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना आणि त्यांच्या सूत्रधारांना उद्धवस्त केले जाईल. यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करण्यासाठी वेळप्रसंगी सीमा ओलांडण्यास लष्कर मागेपुढे पाहणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली. ही बैठक पंतप्रधानांच्या दिल्लीतील ७ लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी जवळपास अडीच तास झाली.

गुरुवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते दहशतवादाविरोधात मोठा संदेश देतील, अशी शक्यता आहे.

सदर बैठकीअगोदर, बुधवारी दिवसभर राजधानी दिल्लीमध्ये बैठकांचे सत्र सुरुच होते. सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विमानतळावर सकाळी बैठक घेतली. त्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सैन्याच्या तिन्ही दल प्रमुखांची बैठकही झाली. त्यानंतर कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक झाली.

कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः दहशतवाद्यांवर कडक कारवाई करण्याची जबाबदारी स्वीकारतील आणि त्यांच्या सूचनेनुसार इतर मंत्री काम करतील.

बैठकीत गृहमंत्री अमित शाहांनी दिला ग्राऊंड रिपोर्ट

कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीरमधील सर्व परिस्थितीची माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. काश्मीरच्या पहलगामला भेट देऊन अमित शाह परतले आहेत. तेथील सर्व परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला आहे. त्याचीच माहिती त्यांनी पंतप्रधान मोदींना बैठकीत दिल्याचे समजते.

परदेश दौऱ्यावरुन परतताच विमानतळावरच पंतप्रधान मोदींनी घेतली बैठक पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास सौदी अरेबियाहून दौरा अर्धवट सोडून परतले. नियोजीत दौऱ्यानुसार ते बुधवारी रात्री परतणार होते.

भारतात दाखल झाल्यानंतर दिल्ली विमानतळावरच त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक झाली. यामध्ये पंतप्रधानांना पहलगाम हल्ल्याची सविस्तर माहिती देण्यात दिली.

त्यानंतर सुरक्षेसाठी आणि दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आवश्यक ती सर्व कारवाई करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले.

CCS Meeting on Pahalgam Attack AT PM Modi's Residence
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईत सतर्कतेचा इशारा

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची तिन्ही सैन्य दल प्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठक

राजधानी दिल्लीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली उच्च-स्तरीय बैठक झाली. या बैठकीत सुरक्षा परिस्थितीचा बैठकीत आढावा घेण्यात आला असून सैन्याच्या तिन्ही दलांना हाय अलर्ट मोडवर राहण्यास सांगण्यात आले असल्याचे समजते.

यावेळी तिन्ही दलांच्या प्रमुखांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. ही बैठक सुमारे अडीच तास चालली.

संरक्षणमंत्र्यांच्या उच्च-स्तरीय बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी आणि हवाई दल प्रमुख ए. पी. सिंह उपस्थित होते.

संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि लष्करी कारवायांचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई हे देखील या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत दहशतवादी हल्ल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीच्या सर्व संभाव्य पैलूंवर चर्चा झाली, असेही सूत्रांनी सांगितले.

बैठकीत, लष्कर प्रमुख जनरल द्विवेदी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा तपशीलवार आढावा सादर केला. यावेळी त्यांनी सैन्य तैनातीची माहिती लष्करप्रमुखांनी दिल्याचे समजते.

CCS Meeting on Pahalgam Attack AT PM Modi's Residence
J&K | पहलगाम हल्ल्यानंतर बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

दहशतवादाविरूद्ध झिरो टॉलरन्स, चोख प्रत्युत्तर देणार - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

पहलगाम हल्ल्यातील हल्लेखारांना पुर्ण ताकदीने प्रत्युत्तर दिले जाईल. दहशतवादाविरूद्ध भारत झिरो टॉलरन्स धोरणाचा अवलंब करेल, असे वक्तव्य करत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दहशतवाद्यांना सुनावले.

नवी दिल्लीत भारतीय हवाई दलाचे मार्शल अर्जन सिंग यांच्या स्मृति व्याख्यानाला संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, पहलगाम हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना योग्य प्रत्युत्तर देण्यासाठी सरकार कोणतीही कसर सोडणार नाही.

त्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत या हल्ल्यात ज्यांचे निधन झाले त्यांच्या कुटुंबीयांप्रति शोकसंवेदना व्यक्त केल्या.

संरक्षणमंत्री म्हणाले की, भारत इतका विशाल देश आहे की अशा कोणत्याही दहशतवादी कारवायांनी आम्हाला घाबरवता येणार नाही.

देशातील पर्यटन स्थळांवर आणि प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरसह राजधानी दिल्ली, आर्थिक राजधानी मुंबई आणि देशातील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. कोकणासह किनारपट्टी असलेल्या भागातही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

काश्मीरसह देशभरात ठिकठिकाणी पोलिसांची गस्त असून प्रमुख शहरांमध्ये येणाऱ्या वाहनांसह लोकांचीही कसून तपासणी केली जात आहे. किनारपट्टी असलेल्या भागातही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सर्व बारीक घडामोडींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना सुरक्षा यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत : कपिल सिब्बल

ज्येष्ठ वकील आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर योग्य पावले उचलण्याची मागणी सरकारकडे केली.

पाकिस्तानला अधिकृतपणे दहशतवादी राष्ट्र घोषित करावे आणि या हत्याकांडासाठी जबाबदार असलेल्यांवर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात खटला चालवावा, असे ते म्हणाले. हा पूर्वनियोजित हल्ला आहे, असे ते म्हणाले. पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी कोणत्याही संकोचाशिवाय पाठिंबा देऊ, असे सिब्बल म्हणाले.

सरकार सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची शक्यता

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर केंद्र सरकारने सर्व कडक कारवाई करण्याची तयारी केली आहे. हे पाऊल उचलण्यापूर्वी, सरकारला विरोधी पक्षांनाही विश्वासात घ्यायचे आहे. विरोधी पक्षानेही या प्रकरणात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

विरोधकांचा पाठिंबा पाहता, सरकार सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा विचार करत आहे. ही बैठक लवकरच बोलावली जाऊ शकते. दरम्यान, काँग्रेसने या प्रकरणी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी आधीच केली आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि कठोर कारवाई करण्यासाठी सरकारला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

उरीसारख्या पलटवार करण्याची तयारी, पाकिस्तानला भिती !

भारत सरकारच्या कडक भूमिकेमुळे पाकिस्तानमध्ये भिती आहे. पाकिस्तानला आता उरीसारख्या हल्ल्याची भीती वाटत आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर यासाठी आवाहन करण्यास सुरुवात केली आहे.

सूत्रांचे म्हणणे आहे की पाकिस्तानने चीनला भारतावर अशी कोणतीही कारवाई न करण्यासाठी दबाव आणण्यास सांगितले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण पाकिस्तानने दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news