पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. File Photo
राष्ट्रीय

TMC announces candidates | 'तृणमूल'ने जाहीर केले सर्व २९४ जागांसाठी उमेदवार,ममता बॅनर्जी भवानीपूरमधून लढणार

TMC announces candidates |भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध सुवेंदू अधिकारी यांच्यात हायव्होल्टेज लढत

पुढारी वृत्तसेवा

TMC announces candidates

कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्‍या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आज दि. १७ मार्च विधानसभा निवडणुकीसाठी सर्व २९४ उमेदवारांची यादी जाहीर केली. यावेळी त्‍यांनी भाजपवर हल्‍लाबेल करत तृणमूलच्‍या जागा मागील निवडणुकीपेक्षा वाढतील, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला. ममता बॅनर्जी भबानीपूरमधून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. भाजपने सुवेंदू अधिकारी यांना भबानीपूर आणि नंदीग्राममधून उमेदवारी दिली आहे.

तुम्हाला लढायचे असेल, तर गॅसचे संकट निर्माण करू नका

पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी म्हणाल्या, "उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वी मी बंगालच्या जनतेचे आभार मानते. मी 'माँ, माती, मानुष' आणि 'बंगालची संस्कृती' सर्वांना समर्पित करते आणि २९४ जागांची उमेदवार यादी प्रसिद्ध करते. मला भाजपला एक गोष्ट विचारायची आहे- तुम्ही का घाबरत आहात? जर तुम्हाला लढायचे असेल, तर गॅसचे संकट निर्माण करू नका; मैदानात कायदेशीर मार्गाने उतरा. निवडणूक आयोगाने (ECI) छान खेळ खेळला आहे... पण भाजपकडे कोणतीही संधी नाही. यावेळी तुमच्या जागा गेल्या वेळेपेक्षाही कमी होतील."

पश्चिम बंगालच्या अस्तित्वाची लढाई

"ही पश्चिम बंगालच्या अस्तित्वाची लढाई आहे. बंगालच जिंकेल. 'दिल्लीचा लाडू' इथे चालणार नाही... मी आज जे परिधान केले आहे ते आपल्या पक्षाचे चिन्ह आहे आणि त्याचा अर्थ 'विजय' असा आहे. माँ, माती, मानुष, बंगालची माती, येथील संस्कृती, ओळख आणि समाजातील सर्व घटक, सर्व जाती, धर्म आणि समुदायांचा सन्मान करत, आज आम्ही आमचा जाहीरनामा आणि २९४ उमेदवारांची यादी जाहीर करत आहोत, अशी घोषणा त्‍यांनी केली.

भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध सुवेंदू यांच्यात हायव्होल्टेज लढत!

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत कोलकाता येथील भवानीपूर मतदारसंघातून एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या हाय-प्रोफाईल निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करताना खुद्द तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी ही घोषणा केली. या निवडणुकीत ममता बॅनर्जी सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याचे लक्ष्‍य ठेवून उतरणार आहेत.

नंदीग्राममध्ये सुवेंदू यांच्‍याविरोधात पवित्रा कर यांना उमेदवारी

सध्‍या सुवेंदू अधिकारी हे नंदीग्रामचे आमदार आहेत. तिथे तृणमूल काँग्रेसने (TMC) पवित्रा कर यांना उमेदवारी दिली आहे. कर हे भाजपचे माजी पंचायत प्रमुख आणि सुवेंदू अधिकारी यांचे एकेकाळचे निकटवर्तीय मानले जात होते. विशेष म्हणजे, उमेदवार यादी जाहीर होण्याच्या अवघ्या काही मिनिटे आधी पवित्रा कर यांनी पुन्हा तृणमूलमध्ये प्रवेश केला.

जुना संघर्ष, नवे रणांगण

ममता बॅनर्जी यांचे एकेकाळचे निष्ठावंत असलेले सुवेंदू अधिकारी यांनी २०२१ च्या निवडणुकीत नंदीग्राममध्ये ममतांचा २,००० पेक्षा कमी मतांच्या फरकाने पराभव केला होता. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत निवडून येण्यासाठी भवानीपूरमधून पोटनिवडणूक लढवली आणि ५८,००० पेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळवला. भवानीपूर हा ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला मानला जातो; २०११ पासून त्यांनी इथून तीनदा विजय मिळवला आहे.

तृणमूलचा सर्वसमावेशकतेवर भर

  • एकूण २९४ जागांपैकी तृणमूल काँग्रेस २९१ जागा लढवणार आहे, तर दार्जीलिंग जिल्ह्यातील उर्वरित ३ जागा आपला मित्रपक्ष 'भारतीय गोर्खा प्रजातांत्रिक मोर्चा' (BGPM) साठी सोडल्या आहेत.

  • उमेदवार निवडीमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने लिंग आणि सामाजिक प्रतिनिधित्वावर मोठा भर दिला आहे.

  • पक्षाने एकूण:५३ महिला उमेदवार

  • ९५ अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) उमेदवार

  • ४८ अल्पसंख्याक समुदायातील उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT