

पर्रीकर गटाला केवळ तीन जागा
प्रोग्रेसिव्हच्या उमेदवारांचे मुख्यमंत्री, दामू नाईक यांच्याकडून अभिनंदन
उत्पल यांनी मानले मतदारांचे आभार
पणजी : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या राज्यातील एकमेव पणजी महापालिकेच्या निवडणुकीत महसूल मंत्री व पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनेलने उत्पल पर्रीकर यांच्या पॅनेलचा धुव्वा उडवत २७ विरुद्ध ३ असा दणदणीत विजय मिळवला. पणजी बाबूशचीच यावर मतदारांनी शिक्कामोर्तब करताना उत्पलास्त्र निष्प्रभ ठरवले. पणजी विधानसभा क्षेत्र आणि ताळगाव विधानसभा क्षेत्रावर बाबूश मोन्सेरात यांचाच राजकीय प्रभाव आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
पणजी महापालिकेच्या ३० प्रभागांसाठी बुधवारी (दि. ११) मतदान झाले होते. शुक्रवारी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम बांबोळी येथे मतमोजणी झाली. पहिल्या सत्रात ताळगाव विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या आठ प्रभागांची मतमोजणी झाली. त्यात ७ विरुद्ध १ असा निकाल हाती लागल्यानंतर पणजी विधानसभा क्षेत्रातील प्रभागांची जसजशी मतमोजणी झाली, तसतसे निकाल हाती येऊ लागले. महत्त्वाचे म्हणजे, गेली ३५ वर्षे पणजी महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येणारे सुरेंद्र फुर्तादो हे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाग क्र. ९ मधून पराभूत झाले. तर त्यांचे पुत्र लेओनिद फुर्तादो हे प्रभाग क्र. ७ मधून पहिल्यांदाच निवडून आले.
भाजपच्या माजी महिला मोर्चाच्या प्रमुख आणि उत्पल पर्रीकर यांच्या पॅनलकडून प्रभाग क्र. ६ मधून रिंगणात असलेल्या डॉ. शीतल दत्तप्रसाद नाईक यांचाही पराभव झाला आहे. मंत्री बाबूश मोन्सेरात व भाजपने पाठिंबा दिलेल्या प्रोग्रेसिव्ह फ्रंट पणजी या पॅनलचे २७ उमेदवार निवडून आले, तर उत्पल पर्रीकर, काँग्रेस, आम आदमी पक्ष या पक्षांनी पाठिंबा दिलेल्या आम्ही पणजीकर या पॅनलचे अवघे तीनच उमेदवार निवडून आले आहेत.
केवळ २ मतांनी विजय
पणजी महापालिकेच्या प्रभाग क्र. १७ मध्ये जॅक सुखिजा हे आम्ही पणजीकर पॅनलचे उमेदवार अवघ्या दोन मतांनी निवडून आले. त्यांनी प्रोग्रेसिव्ह पणजी पॅनलचे उमेदवार विद्यमान नगरसेवक जॉर्ज डेनिस यांचा दोन मतांनी पराभव केला. सुखिजा यांना ३४४ तर डेनिस यांना ३४२ मते मिळाली. सुखिजा हे आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्याबद्दल आपचे गोवा अध्यक्ष वाल्मीकी नाईक यांनी सुखिजा यांचे अभिनंदन केले.
२०२१ पेक्षाही जास्त यश
२०२१ मध्ये भाजप व मोन्सेरात समर्थक पॅनलला ३० पैकी २५ जागा मिळाल्या होत्या. यावेळी २७ जागा मिळाल्या. आम्ही पणजीकर पॅनलचे प्रभाग ७ मधून लेओनिद फुर्तादो, प्रभाग १७ मधून जॅक सुखिजा व प्रभाग २९ मधून लिबर्टा मेंडिस हे उमेदवार निवडून आले. उर्वरित २७ जागी भाजप व मोन्सेरात समर्थक प्रोग्रेसिव्ह पणजी पॅनलचे उमेदवार जिंकले.
सुरेंद्र फुर्तादो पराभूत
पणजी महापालिकेवर सर्वात जास्त काळ निवडून येणारे ज्येष्ठ नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांचा या निवडणुकीत पराभव झाला. भाजप समर्थक प्रोग्रेसिव्ह पॅनलचे उमेदवार कबीर मखीजा पिंटो यांनी फुर्तादो यांचा प्रभाग ९ मध्ये पराभव केला. फुर्तादो यांना ४०४ तर पिंटो यांना ५१९ मते मिळाली.
जॅक पणजीचा आवाज बुलंद करतील : वाल्मीकी नाईक
जॅक सुखिजा यांच्या विजयावर आप गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मीकी नाईक यांनी सांगितले की, जसे आमच्या दोन आमदारांनी गोवा विधानसभेत दाखवून दिले की, संख्येपेक्षा आवाजाची ताकद महत्त्वाची असते, तसेच आमचे नगरसेवकही त्याच निर्धाराने पणजीच्या नागरिकांचे प्रश्न मांडतील. आम्ही पणजीकर पॅनलला कमकुवत करण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचना, मतदार यादी आणि आरक्षण पद्धतीत बदल करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, मतदारांनी सार्वजनिक सेवेची बांधिलकी असलेल्या उमेदवारालाच निवडून दिले, असे त्यांनी सांगितले.
रोहित मोन्सेरात विजयी
विद्यमान महापौर व मंत्री बाबूश मोन्सेरात यांचे पुत्र रोहित मोन्सेरात हे प्रभाग क्र. ४ मधून निवडून आले. त्यांनी आम्ही पणजीकर पॅनेलचे जॉन पो यांचा पराभव केला. रोहित मोन्सेरात यांना ४०२, तर पो यांना १५८ मते मिळाली.
तीन जागा गेल्या याची खंत : बाबूश
"आपले लक्ष्य ३० पैकी ३० जागा जिंकायचे होते. आपण स्वतः तेथे प्रचार केला नाही, त्यामुळे तीन प्रभागांत आमच्या पॅनेलचे उमेदवार पराभूत झाले, याची खंत आहे. भाजप पक्ष, मुख्यमंत्री व प्रदेश अध्यक्षांनी आपणावर विश्वास दाखवला त्याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देतो. पणजीच्या मतदारांचेही आभार व्यक्त करतो," अशी प्रतिक्रिया मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिली.
अपेक्षेप्रमाणे निकाल लागले नाहीत : पर्रीकर
"महापालिकेच्या अलीकडच्या निवडणुकीत आम्ही पणजीकर पॅनेलला पाठिंबा दिल्याबद्दल उत्पल पर्रीकर यांनी पणजीतील मतदारांचे आभार मानले. निकालानंतरच्या प्रतिक्रियेत त्यांनी म्हटले की, प्रचारावेळी काम करणाऱ्या उमेदवार, स्वयंसेवक आणि समर्थकांचे आभार. शहरासाठी चांगले नियोजन, पारदर्शकता, जबाबदार प्रशासन यावर चर्चांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू केला. निकाल अपेक्षेप्रमाणे आले नाहीत. विजयी उमेदवारांचे अभिनंदन. नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आणि शहरातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील."