

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने आपली पहिली मोठी खेळी खेळली आहे. भाजपने आज १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, यात सर्वात मोठे आकर्षण ठरले आहे ते म्हणजे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात सुवेंदु अधिकारी यांची झालेली निवड. विशेष म्हणजे, भाजपने सुवेंदु अधिकारी यांना एकाच वेळी दोन महत्त्वाच्या मतदारसंघांतून मैदानात उतरवले आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सध्या भवानीपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. भाजपने याच हाय-प्रोफाइल जागेवर आपले 'फायरब्रँड' नेते सुवेंदु अधिकारी यांना उमेदवारी देऊन थेट आव्हान दिले आहे. यामुळे भवानीपूरमधील लढत आता संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे.
सुवेंदु अधिकारी केवळ भवानीपूरच नाही, तर आपल्या हक्काच्या 'नंदीग्राम' मतदारसंघातूनही निवडणूक लढवणार आहेत. नंदीग्राम हा अधिकारी यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि तेथून ते सध्या विद्यमान आमदार आहेत. ममता बॅनर्जी आणि सुवेंदु अधिकारी यांच्यातील जुना राजकीय संघर्ष पाहता, भाजपने त्यांना दोन जागांवरून उमेदवारी देऊन तृणमूल काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
पश्चिम बंगालमधील एकूण २९४ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात (२३ एप्रिल) १५२ जागांवर मतदान होईल. तर दुसरा टप्प्यात (२९ एप्रिल) १४२ जागांवर मतदान होणार आहे.
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक १२ मार्च रोजी नितिन नवीन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेन्द्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. या बैठकीत १४४ नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले, ज्यामध्ये ११ महिला उमेदवारांचा समावेश आहे.
मुस्लिम बहुल असलेल्या मुर्शिदाबाद मतदारसंघातून भाजपने गौरी शंकर घोष यांना मैदानात उतरवले आहे. ही जागा सध्या चर्चेत आहे कारण तृणमूल काँग्रेसचे (TMC) बंडखोर आमदार हुमायूं कबीर येथे नवीन बाबरी मशीद बांधत असून त्यांनी आपला नवीन पक्षही स्थापन केला आहे.