Haryana Rohnat village not hoist Tricolour
चंदीगड : देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे लोटली आहेत. तरीही एका गावात जवळपास 70 वर्षे तिरंगाच फडकवण्यात आला नव्हता. हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यातील रोहनाट हे गाव 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटिशांविरुद्ध उठाव करणाऱ्या गावांपैकी एक होतं. परंतु त्या उठावाची किंमत या गावाला मोजावी लागली.
या गावात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही 2018 सालापर्यंत स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकवला जात नव्हता. कारण होतं — ब्रिटिशांनी या गावाला 'बंडखोरांचं गाव' घोषित करून संपूर्ण जमीन जप्त केली होती, जी अजूनही गावकऱ्यांना परत मिळालेली नाही. याबाबतचे वृत्त न्यूज 18 ने दिले आहे.
29 मे 1857 रोजी रोहनाटच्या क्रांतिकाऱ्यांनी तुशाम (गावापासून 19 किमी अंतरावर) येथील सरकारी तिजोरी लुटली. त्यानंतर हिसारमधील गुजरी महाल तुरुंगात हल्ला करून कैद्यांना मुक्त केलं.
हिसार आणि हांसी येथे ब्रिटिश अधिकाऱ्यांवर हल्ले करून अनेक अधिकाऱ्यांचा मृत्यू घडवून आणला. या उठावात रोहनाटसह पुठ्ठी मंगलखान, मंगली, हाजीपूर आणि जामालपूर या गावांचे नागरिकही सहभागी झाले होते.
ब्रिटिशांनी यानंतर गावाला घेरलं. 'प्लाटून 14' या सैन्याने गावाच्या सीमारेषांवर तोफा तैनात केल्या. बंडखोरीचे नेते बिरहद बैरागी, नोंदा जाट आणि रूपा खाटी यांना तोफेच्या तोंडावर बांधून उडवलं गेलं. त्यांच्या शरीराचे तुकडे शेतात विखुरले गेले.
गावातील अनेक पुरुषांना घरातून ओढून नेत जुन्या वडाच्या झाडाला फाशी देण्यात आली. हांसीमध्ये 100 हून अधिक क्रांतिकारकांना रोड रोलरखाली चिरडून ठार करण्यात आलं. या ठिकाणी असलेला रस्ता आजही 'लाल सडक' म्हणून ओळखला जातो.
त्या वेळी गावातील स्त्रिया आणि लहान मुलांनी जीव वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारल्याची आठवण आजही गावकरी सांगतात. ही विहीर आजही गावात असून तिच्या सभोवताली सिमेंटची भिंत बांधलेली आहे. पाणी शेवाळामुळे हिरवं दिसतं, आणि आजही त्यात किती जणांनी जीव दिला, याचा हिशोब गावकऱ्यांना माहीत नाही.
14 सप्टेंबर 1857 रोजी हिसारचे तत्कालीन उपायुक्त विल्यम ख्वाजा यांनी रोहनाटला ‘बंडखोरांचं गाव’ घोषित केलं. 20 जुलै 1858 रोजी 20656 बिघा आणि 19 मरल्यांची खासगी आणि पंचायत जमीन केवळ 8100 रुपयांना लिलावात विकली गेली. गावकऱ्यांच्या ताब्यात फक्त 13 बिघा आणि 10 बिसवा जमीन उरली — तीही फक्त तलाव आणि विहिरीसाठी.
स्वातंत्र्यानंतरही गावात 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला तिरंगा फडकवला जात नव्हता. एका गावकऱ्याने सांगितलं, “आम्हाला अजूनही त्या ब्रिटिश काळातील निर्दयी फर्मानाची आठवण येते. जमीनही परत मिळालेली नाही. आम्ही अजूनही बंडखोरच आहोत!”
2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी 23 मार्च रोजी 'शहीद दिवस' निमित्त स्वतः रोहनाटमध्ये येऊन तिरंगा फडकावला आणि गावकऱ्यांच्या मागण्या सोडवण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर गावात अधिकृतरीत्या तिरंगा फडकवला जात असला तरी गावकऱ्यांची मागणी आहे की, सरकारने जप्त केलेली जमीन परत करावी. आज अनेक कुटुंबांकडे दोन एकरपेक्षा कमी जमीन आहे — तीही पिढ्यानपिढ्या वाटून तुकडे झाल्यामुळे. गावात राष्ट्रशक्तीला मान दिला जातो, पण अजूनही स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन हे इतर ठिकाणी जशा थाटात साजरे होतात, तसं रोहनाटमध्ये होत नाही.