

Alwada dalit haircut
अहमदाबाद : गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील अलवाडा गावात 7 ऑगस्ट रोजी एक ऐतिहासिक घटना घडली. 24 वर्षीय कीर्ती चौहान या दलित युवकाला गावातील सलूनमध्ये केस कापण्याची सेवा मिळाली. हे केवळ वैयक्तिक स्वातंत्र्याचे नव्हे, तर सामाजिक समतेच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे.
गेल्या 78 वर्षांत ही पहिलीच वेळ होती की गावातील एखाद्या दलिताला स्थानिक न्हाव्यांकडून सेवा मिळाली.
अलवाडा गावाची लोकसंख्या सुमारे 6500 असून त्यात सुमारे 250 दलित कुटुंबे आहेत. अनेक पिढ्यांपासून दलित समाजाला गावातील न्हाव्यांकडून सेवा नाकारली जात होती. त्यामुळे त्यांना शेजारच्या गावांमध्ये जाऊन, आपली जात लपवून केस कापावे लागत होते.
58 वर्षीय छोगाजी चौहान यांनी आपल्या भावना मांडताना सांगितले, “आमचे पूर्वज स्वातंत्र्यपूर्व काळातसुद्धा हा अपमान सहन करत होते आणि आमच्या पोरांनीही तो 78 वर्षे सहन केला.”
ही बदलाची प्रक्रिया सहज घडलेली नाही. सामाजिक कार्यकर्ते चेतन दाभी यांनी गावातील उच्चवर्णीय आणि न्हावी समाजाशी चर्चा करून, त्यांना सामाजिक अस्पृश्यता नाकारण्याबाबत जागरूक केले.
परंतु संवाद निष्फळ ठरल्यावर पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप केला. मामलतदार जनक मेहता यांनी गावातील नेतृत्वाशी मध्यस्थी करत सकारात्मक तोडगा काढला.
कीर्ती चौहान यांनी सांगितले की, “24 वर्षांत पहिल्यांदाच मी माझ्या गावात न्हाव्याच्या खुर्चीत बसलो. त्या दिवशी मला माझ्या गावात खरं स्वातंत्र्य वाटलं. याआधी आम्हाला कायम बाहेर जावे लागे.”
गावातील सर्व पाच न्हाव्यांच्या दुकानांमध्ये आता दलित ग्राहकांचे स्वागत होते. पिंटू (वय 21) या तरुण सलून व्यावसायिकाने कीर्ती याचे केस कापले. त्याने स्पष्ट सांगितले की, “आधी परंपरा पाळत होतो, पण आता मोठ्यांनी मान्यता दिल्यावर आम्हाला काही अडचण नाही. उलट आमच्या व्यवसायालाही याचा फायदा होतोय.”
दलित समाज या बदलाचे स्वागत करतोय, मात्र ते हेही मान्य करतात की अजून बऱ्याच गोष्टी बदलायला हव्यात. दलित शेतकरी ईश्वर चौहान यांनी सांगितले की, “आज आपण न्हाव्याकडे जाऊ शकतो, पण अजूनही सामाजिक जेवणावळींमध्ये वेगळं बसवतात. एक दिवस तेही बंद होईल अशी आशा आहे.”
गावचे सरपंच सुरेश चौधरी यांनी या बदलावर आनंद व्यक्त करत सांगितले की, “माझ्या कारकिर्दीत हा अन्याय संपला, याचा मला आनंद आहे.”
प्रकाश पटेल (पाटीदार समाज) यांनी म्हटले, “माझ्या किराणा दुकानात सगळे ग्राहक येतात. मग न्हाव्याच्या दुकानात का नाही? ही चुकीची प्रथा संपली, हे चांगले झाले. सुरुवात झाली आहे, अजून बरंच काही बाकी आहे.