Supreme court raps bihar judge : "तुमची कायद्याची समज पाहून आम्हाला खरोखरच आश्चर्य वाटते. तुम्ही सर्वप्रथम 'बीएनएसएस' (BNSS) च्या कलम ३८४ आणि 'सीआरपीसी' (CrPC) च्या कलम ३४५ ची व्याप्ती समजून घेतली पाहिजे, न्यायिक अधिकारांचा वापर करताना "बाहुबलीसारखे वागू नका," अशा शब्दांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश न पाळल्याबद्दल एका पोलीस अधिकाऱ्याला दोषी ठरवणाऱ्या बिहारमधील सत्र न्यायाधीशांना फटकारले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या 'न्यायालयीन अवमान कायद्या'च्या समजेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांना प्रशिक्षणासाठी 'नॅशनल ज्युडिशिअल अकादमी'मध्ये पाठवले जावे, असा आदेशही सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने दिला.
२०२३ मध्ये निकाली निघालेल्या एका फौजदारी खटल्यात खोटे पुरावे दिल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीविरोधात एफआयआर नोंदवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. या आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याप्रकरणी सत्र न्यायाधीश अनिल कुमार यांनी २९ सप्टेंबर २०२६ रोजी रोहतासचे तत्कालीन पोलीस अधीक्षक (आयपीएस अधिकारी) रौशन कुमार यांना दोषी ठरवले होते. याप्रकरणी न्यायिक अधिकाऱ्याने पोलीस अधीक्षकांना १ रुपयाचा प्रतिकात्मक दंड ठोठावला होता. तसेच, न्यायालयाने नोंदवलेली निरीक्षणे संबंधित अधिकाऱ्याच्या सेवा पुस्तिकेत (Service Records) नमूद करण्याचे निर्देश बिहारच्या पोलीस महासंचालकांना (DGP) दिले होते. याशिवाय, आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना लोकशाही व्यवस्थेशी अधिक सुसंगत बनवण्यासाठी त्यांच्या प्रशिक्षणात आमूलाग्र बदल करावेत, असेही त्यांनी केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयाला सांगितले होते. त्यानंतर, न्यायालयाच्या अवमानाबद्दल पोलीस अधीक्षकांना दंड ठोठावण्याच्या या आदेशाला पाटणा उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती.
सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने सासाराम (रोहतास) येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश-४ अनिल कुमार यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आदेशाचे पालन न करण्याच्या कृतीला 'न्यायालयाच्या समक्ष घडलेला गुन्हा' (offence committed in the face of the court) मानून, पोलीस अधिकाऱ्याला त्याच दिवशी दोषी ठरवल्याबद्दल खंडपीठाने त्यांच्यावर ताशेरे ओढले.
वृत्तसंस्था 'पीटीआय'ने दिलेल्या माहितीनुसार, खंडपीठाने म्हटले की, "कायद्याबद्दलच्या तुमच्या आकलनाचे आम्हाला खरोखरच आश्चर्य वाटते. तुम्ही सर्वप्रथम भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे (BNSS) कलम ३८४ आणि फौजदारी प्रक्रिया संहितेचे (CrPC) कलम ३४५ यांची व्याप्ती आणि मर्यादा समजून घेतल्या पाहिजेत. कोणी न्यायालयात एखाद्याला चापट मारली, न्यायालयाचा अपमान केला किंवा सांगूनही न्यायालयीन कक्ष सोडण्यास नकार दिला, तर तो न्यायालयाच्या समक्ष घडलेला गुन्हा ठरतो. परंतु, जर आम्ही एखाद्याला एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आणि त्यांनी ते केले नाही, तर तो न्यायालयाच्या समक्ष घडलेला गुन्हा ठरत नाही."
न्यायमूर्ती बागची यांनीही या प्रकरणावर कडक शब्दांत भाष्य केले. "कायद्याचे तुमचे आकलन अत्यंत धक्कादायक आहे. तुम्ही अत्यंत आक्रमक भूमिका घेत पोलीस अधीक्षकांना बोलावून घेतले आणि त्याच दिवशी त्यांना दोषी ठरवले," असे ते म्हणाले.
निरीक्षण न्यायाधीशांच्या हस्तक्षेपावर न्यायिक अधिकाऱ्याने घेतलेल्या आक्षेपावर प्रश्न उपस्थित करताना न्यायमूर्ती बागची पुढे म्हणाले की, "जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना बोलावून घेणे, त्यांची अनुपस्थिती हा न्यायालयाच्या समक्ष घडलेला गुन्हा मानणे आणि त्यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावणे, हे सर्व तुमच्या अधिकारक्षेत्रात आणि कक्षेत होते का? तुम्हीही आता तुमचे हात आवरा. हा अतिउत्साह आता पुरे झाला."