

Supreme Court ruling on builder bank nexus home loan recovery
"बँका आणि बिल्डर्स यांच्यातील कर्ज वितरण प्रक्रियेची तपासणी केल्यानंतर घरखरेदीदार स्पष्टपणे डिफॉल्टर असल्याचे आढळत नाही, तोपर्यंत सक्षम न्यायालय त्यांना हप्ते भरण्याबाबत कोणताही अंतरिम आदेश देऊ शकत नाही," असे निर्देश सरन्यायाधीश (CJI) सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने नुकताच दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या निर्देशाने घरखरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
'लाईव्ह लॉ'ने दिलेल्या वृत्तानुसार गुडगावमधील सोहना परिसरात 'रहेजा डेव्हलपर्स लिमिटेड' या खासगी बिल्डर-कम-डेव्हलपर कंपनीने राबवलेल्या 'कृष्णा हाऊसिंग स्कीम' प्रकल्पातील बाधित घरखरेदीदारांनी सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांनी घेतलेल्या गृहकर्जासंदर्भात घरखरेदीदार, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि रहेजा डेव्हलपर्स यांच्यात एक त्रिपक्षीय करार झाला होता. या करारानुसार, बांधकामाच्या प्रगतीनुसार कर्जाचे हप्ते वितरित करणे अपेक्षित होते. मात्र, रहेजा डेव्हलपर्सने करारातील अटींचे पालन केले नाही आणि बांधकामात कोणतीही प्रगती नसतानाही एसबीआयने बिल्डरला कर्जाची रक्कम अदा केल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला होता. याविरोधात दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेवर सरन्यायाधीश (CJI) सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली.
याचिकाकर्ते घरखरेदीदार आणि त्यांच्यासारख्याच इतर बाधित खरेदीदारांना कोणत्याही दंडात्मक किंवा सक्तीच्या कारवाईपासून संरक्षण देताना खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, "आमच्या मतानुसार, सक्षम न्यायालयाचे हे प्राथमिक आणि बंधनकारक कर्तव्य आहे की त्यांनी सर्वप्रथम बिल्डर आणि बँक अधिकारी यांच्यातील साटेलोटे (संगनमत) तपासले पाहिजे, असे खंडपीठानेस्पष्ट केले.
बँकेने बिल्डरला वितरित केलेली कर्जाची रक्कम ही 'त्रिपक्षीय कराराच्या' अटींनुसारच दिली आहे का, याचीही खातरजमा करावी.
घरखरेदीदार कसूरदार असल्याचा स्पष्ट निष्कर्ष जोपर्यंत नोंदवला जात नाही, तोपर्यंत त्यांच्याविरुद्ध हप्ते भरण्याचे कोणतेही अंतरिम निर्देश जारी केले जाऊ शकत नाहीत.
वरील मुद्द्यावर प्रथम निर्णय घेतल्याशिवाय दिवाणी न्यायालयाने याचिकाकर्ते किंवा समसमान परिस्थितीतील घरखरेदीदारांविरुद्ध कोणतीही सक्तीची कारवाई करू नये.
सर्वोच्च न्यायालयाने २०२४ मध्येही दिल्ली-नोएडा येथील रखडलेल्या गृहप्रकल्पांतील अनेक घरखरेदीदारांना असाच अंतरिम दिलासा दिला होता. त्यावेळी बँका, वित्तीय संस्था आणि बिल्डर्सकडून होणाऱ्या सक्तीच्या वसुली कारवाईला, तसेच चेक बाऊन्स प्रकरणातील कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिली होती.त्यानंतर, राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (NCR) बिल्डर आणि बँकांच्या कथित साटेलोट्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली होती. "गरीब घरखरेदीदारांना वेठीस धरले जात आहे," असे ताशेरे ओढत न्यायालयाने या प्रकरणाची एसआयटी (SIT) किंवा सीबीआयमार्फत (CBI) चौकशी होणे आवश्यक असल्याचे संकेत दिले होते. सीबीआयकडून चौकशीचा प्रस्ताव मागवल्यानंतर, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये न्यायालयाने सीबीआयला ७ प्राथमिक चौकशा (PE) नोंदवण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाच्या परवानगीनंतर सीबीआयने एनसीआर बाहेरील प्रकल्पांसह एकूण २८ नियमित गुन्हे दाखल केले असून, आरोपपत्र दाखल झाल्यानंतर संबंधित महानगर दंडाधिकाऱ्यांना कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.