Sunetra Pawar meets PM Modi Pudhari
राष्ट्रीय

Sunetra Pawar meets PM Modi: दिल्ली दौऱ्यात सुनेत्रा पवारांची मोदी-शहा यांच्याशी भेट; उपमुख्यमंत्रिपदासाठी केंद्राचा पाठिंबा

अजित पवारांच्या निधनानंतर पहिली दिल्ली भेट; 40 मिनिटांची पंतप्रधानांशी चर्चा, पक्षातील पुढील घडामोडींवरही खलबते

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली ः प्रशांत वाघये

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. या तिन्ही मान्यवरांनी सुनेत्रा पवार यांचे सांत्वन केले आणि उपमुख्यमंत्री म्हणून नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देत चांगले काम करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशा शब्दांत धीर दिला.

Sunetra Pawar meets Amit Shah

सुनेत्रा पवार यांच्यासोबत त्यांचे पुत्र पार्थ पवार, जय पवार आणि पक्षातील वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे उपस्थित होते. दरम्यान, सुनेत्रा पवारांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला नाही आणि दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणासाठीही अजित पवार गट आता तरी फार इच्छुक नसल्याचे समजते. तसेच, पुढच्या काही दिवसांमध्ये सुनेत्रा पवारांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात येणार असल्याचेही समजते.

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सुनेत्रा पवार मंगळवारी रात्री पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर आल्या. त्यानंतर बुधवारी सकाळी त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या. तेथे सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, पार्थ पवार, जय पवार यांच्यामध्ये काही काळ चर्चा झाली. त्यानंतर ते संसदेत गेले.

पंतप्रधानांसोबत 40 मिनिटे भेट

संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयात सुनेत्रा पवारांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली. सुमारे 40 मिनिटे ही भेट चालली. या भेटीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी सुनेत्रा पवार यांचे सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला. सोबतच, उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही उत्तम काम करा, अशा शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींच्या पाठोपाठ सुनेत्रा पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ही भेट जवळपास 30 मिनिटे चालली. या भेटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षातील पुढच्या काळातील घडामोडी यावरही चर्चा झाल्याचे समजते. या भेटीनंतर सुनेत्रा पवारांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांची सौजन्य भेट घेतली. या भेटीमध्ये सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देतील, अशी चर्चा होती. मात्र, सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला नाही आणि इतक्यात त्या राजीनामा देणारही नसल्याचे समजते.

सुनेत्रा पवार संसद परिसरात दाखल झाल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाकडे जात होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके समोरून येत होते. दरम्यान, नीलेश लंके यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली. यावेळी खासदार लंके यांनी सुनेत्रा पवारांना लवून नमस्कार केला. सुनेत्रा पवारांनीही नीलेश लंकेंची विचारपूस केली.

सुधा मूर्तींना भेटल्यानंतर सुनेत्रा पवार भावुक

सुनेत्रा पवार संसद परिसरात असताना राज्यसभा सदस्य सुधा मूर्ती यांच्याशी त्यांची भेट झाली. या भेटीप्रसंगी सुधा मूर्तींनी सुनेत्रा पवारांना जवळ घेतले. या क्षणी सुनेत्रा पवार भावुक झाल्याचे दिसले. सुधा मूर्तींची गळाभेट घेताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते.

म्हणून राजीनामा नाही?

येत्या एप्रिल महिन्यात राज्यसभेतील काही जागा रिक्त होत आहेत. या जागांचा विचार करून, तसेच राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी पुढच्या काळात होण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा विचार करून निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते. ‌‘एनडीए‌’मधील वरिष्ठांनीही तूर्तास राजीनामा देऊ नका, असे सांगितल्याचे समजते.

पक्षाच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवारच

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड जवळपास निश्चित आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मुंबईत घेतली जाईल. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचे समजते. पक्षाच्या सर्व नेत्यांचे यावर एकमत आहे, त्यामुळे सर्वानुमते बिनविरोध निवड होईल. मात्र, पक्षाच्या संविधानानुसार ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

पार्थ पवार राज्यसभेवर येणार

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली असली, तरी त्या अजूनही राज्यसभेच्या खासदार आहेत. त्या जेव्हा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतील तेव्हा पार्थ पवार राज्यसभेवर येणार असल्याचे समजते. मात्र, नजीकच्या काळात राजकीय घडामोडी होत आहेत ते पाहता लवकर कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT