नवी दिल्ली: वाशिम–अकोला मार्गे नांदेड ते कुर्ला रेल्वे सेवा तात्काळ सुरू करावी, अशी मागणी खासदार संजय देशमुख यांनी गुरुवारी लोकसभेत केली. २९ ऑगस्ट २०२३ रोजी केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे बोर्डाने नांदेड–कुर्ला रेल्वे सेवेला वाशिम–अकोला मार्गे औपचारिक मंजुरी दिली होती, असे ते म्हणाले.
लोकसभेत बोलताना त्यांनी सांगितले की, 17665/66 आणि 17667/68 अशा क्रमांकाने मंजूर झालेली ही सेवा वाशिम जिल्ह्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार होती. परंतु मंजुरी मिळून दोन वर्षांहून अधिक काळ उलटूनही आजतागायत रेल्वे प्रशासनाने ही गाडी सुरू केलेली नाही, ही खेदजनक बाब असल्याचे संजय देशमुख यांनी अधोरेखित केली.
वाशिम हा आकांक्षित जिल्हा असल्याने विकासाच्या प्रत्येक संधीचे महत्त्व अधिक असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. आज वाशिमवरून मुंबईकडे एकही थेट रेल्वे सेवा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना, रुग्णांना, कामगारांना, व्यापाऱ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले.
ही नवी रेल्वे सुरू झाल्यास प्रवास सुलभ आणि जलद होईलच, तसेच रेल्वे स्थानकांवर नव्या सुविधा उभ्या राहून स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध होईल, असे खासदार संजय देशमुख यांनी नमूद केले.
मंजुरी असूनही दोन वर्षे रेल्वे सेवा प्रत्यक्षात सुरू न होणे हे वाशिम जिल्ह्याच्या न्याय्य विकासावर अन्याय असल्याचे त्यांनी मांडले.