

Indigo Flight Bomb Threat: मदीनाहून हैदराबादला जाणारे विमान बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर काही तासांमध्येच हैदराबादला जाणारे इंडिगोचे आणखी एक विमानही अशाच धमकी मिळाली. शारजाहहून उड्डाण करणारे विमान मुंबईकडे वळवण्यात आले.
FlightRadar24 ने दिलेल्या माहितीनुसार, इंडिगो विमानाने युएईमधील शारजाह येथून उड्डाण केले. हे विमान हैदराबादला जाणार होते. तथापि, बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर ते हवेतच वळवण्यात आले आणि मुंबईत उतरवण्यात आले. याबाबत इंडिगोने अधिकृत निवेदन जाहीर केलेले नाही.
सौदी अरेबियातील मदीनाहून हैदराबादकडे निघालेल्या इंडिगोच्या एका विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर मोठी खळबळ उडाली. या धमकीमुळे तातडीची खबरदारी म्हणून गुरुवारी दुपारी हे विमान गुजरातमधील अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन स्थितीत उतरवण्यात आले.इंडिगो एअरलाइन्सला विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याचा दावा करणारा एक ईमेल मिळाल्यानंतर ही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सुमारे १२ वाजून ३० मिनिटांनी हे विमान अहमदाबाद विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. विमानाच्या वैमानिकाने धोका लक्षात घेऊन तातडीने अहमदाबाद विमानतळावर उतरण्याचा निर्णय घेतला, कारण अहमदाबाद हेच विमानतळ सर्वात जवळचे होते.या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा दलांनी तातडीने धाव घेतली. विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर विमानाची कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल बन्सल यांनी दिली.
इंडिगो एअरलाइनच्या विमानांना खूप उशीर होत आहे किंवा ती रद्द केली जात आहेत. त्यामुळे देशभरातील विमानतळांवर प्रवाशांची खूप गैरसोय होत आहे. कंपनीने त्यांच्या कर्मचारी कामाचे वेळापत्रक (रोस्टर नियम) बदलले आहेत. या नवीन नियमांमुळे कंपनीला काम सांभाळणे अवघड झाले आहे.त्यामुळे इंडिगोची चौकशी सुरू आहे.गुरुवारपर्यंत, इंडिगोची 300 पेक्षा जास्त विमाने रद्द करावी लागली. प्रमुख शहरांमधील आज (दि. ४) रद्द झालेल्या विमानांची संख्या पुढील प्रमाणे : मुंबई: ८५, हैदराबाद: ६८,बेंगळूरु: ७३,दिल्ली: ३३.