

Rahul Gandhi On Putin Visit:
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. आज (दि. ४ डिसेंबर) पासून हा दौरा सुरू झाला आहे. मात्र राहुल गांधी यांनी केंद्र सरकार काही संकेत आणि परंपरा पाळत नसल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांनी केंद्र सरकार कोणत्याही परदेशी नेत्याला विरोधी पक्षनेत्यांची भेट घेऊ देण्याची परवानगी देत नाही. हे सरकार जुने संकेत पाळत नाही असं वक्तव्य संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना केलं.
राहुल गांधी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, 'सर्वसाधारणपणे परंपरा अशी होती की कोणताही दुसऱ्या देशाचा उच्चपदस्थ भारतात आला की तो भारताच्या विरोधीपक्ष नेत्याची भेट घेत होता. ही परंपरा वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सुरू होती. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये सुरू होती. मात्र आता अशी परिस्थिती नाहीये. ज्यावेळी मी परदेशात भेट देतो. त्यावेळी सरकार त्या देशातील उच्चपदस्थांना लोकसभेच्या विरोधीपक्षनेत्याला न भेटण्याचा सल्ला देतात. लोकं आम्हाला सांगतात की तुम्हाला भेटू नका असा सल्ला देण्यात आला आहे.'
राहुल गांधी पुढे म्हणाले 'लोकसभा विरोधीपक्षनेता हा दुसरा दृष्टीकोण देत असतो. आम्ही देखील भारताचं प्रतिनिधित्व करतो. मात्र सरकारला आम्ही विदेशी उच्च पदस्थांना भेटू नये असं वाटतं. असुरक्षितता वाटते म्हणूनच पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्रालय जुनी परंपरा पाळत नाहीये.'
दरम्यान, काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचं समर्थन केलं. त्यांनी लोकशाहीमध्ये इतर देशांच्या नेत्यांना कोणत्याही बाजूच्या नेत्यांना भेटण्याचं स्वातंत्र्य असावं असं सांगितलं.
काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी देखील राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, 'हे खूप विचित्र आहे. दौऱ्यावर येणारे इतर देशांचे नेते हे विराधीपक्षनेत्यांना भेटतात हा प्रोटोकॉल आहे. मात्र हा प्रोटोकॉल सरकार पाळत नाही. त्यांची सर्व धोरणे याच तत्वावर आधारित आहेत. त्यांना कोणीही त्यांच्या विरूद्ध बोलू नये असं वाटतं.'
'ते इतर विरोधी पक्षाचे ऐकून घेत नाहीत. ते लोकशाहीच्या काही संकेतांना बांधील आहेत. ते कशाला घाबरतात देवालाच माहिती. लोकशाहीत प्रत्येकाला त्यांचे मत मांडण्याचा अधिकार असतो. चर्चा होते. त्यानंतरच योग्य ती कार्यवाही केली जाते. मात्र हे सरकार घाबरते. त्यांचे निर्णय त्याचेच प्रतिबिंब आहे. असे प्रोटोकॉल ब्रेक करून त्यांना काय मिळणार आहे. जगात आपल्या लोकशाही देशाच्या प्रतिमेला तडे जात आहेत.'