

IAS-IPS Promotion Post: भारतात आयएएस आणि आयपीएस या सरकारी नोकऱ्यांची क्रेज प्रचंड आहे. ही पदे मिळवण्यासाठी देशातील लाखो मुलं स्पर्धा परीक्षा, युपीएससी परीक्षा देतात. दर वर्षी जवळपास १० लाख तरूण युपीएससीच्या परीक्षेला बसतात. या परीक्षेमार्फतच देशाला पुढचे आयएएस आणि आयपीएस अधिकारी मिळतात. मात्र एकदा का आयएएस किंवा आयपीएस झाल्यानंतर त्यांना पदोन्नतीद्वारे कोणती पदे मिळतात.... चला याबाबत जाणून घेऊयात...
सामान्य प्रशासनमध्ये ज्यांना रस असतो ते आयएएस अधिकारी होणं पसंत करतात. तर ज्यांना कायदा आणि सुव्यवस्था यात रस असतो ते आयपीएस अधिकारी होण्याचा निर्णय घेतात. आयएएस अधिकाऱ्याचे काम हे सार्वजनिक प्रशासन सांभाळणं असतं. ते सरकारी योजना लागू करतात. व्यवस्था आणि त्यांना दिल्या गेलेल्या विभागात काही गडबड तर नाही ना हे ते पाहतात.
दुसरीकडं आयपीएस अधिकारी पोलीस सेवेत काम करतात. त्यांचा प्रमुख उद्येश कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवणं हा असतो. गुन्ह्याचा तपास करणं, सार्वजनिक व्यवस्था अबाधित ठेवणं. सण, दंगली यांच्यावेळी शांतता प्रस्थापित रहावी यासाठी काम करणं ही प्रमुख कामे आयपीएस अधिकारी करत असतो.
तुम्ही आयएएस आयपीएस झाल्यानंतर तुम्हाला जिल्हाधिकारी अन् पोलीस अधीक्षक हीच पदे मिळतात असं नाही. पदोन्नतीनंतर आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना अनेक पदे मिळतात. या अधिकाऱ्यांचे प्रमोशन हे सेवा अनुभव आणि सर्व्हिस रेकॉर्ड या दोन गोष्टींवर विशेष अवलंबून असतं. या अधिकाऱ्यांना ऑल इंडिया सर्व्हिस प्रमोशन नियमानुसार पदोन्नती मिळते. आयएएसची सर्वात मोठी पोस्ट ही मुख्य सचिव किंवा कॅबिनेट सचिव ही असते. तर आयपीएस अधिकाऱ्यांची सर्वात मोठी पोस्ट ही डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस (DGP) अर्थात पोलीस महासंचालक ही असते.
आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती ही ऑल इंडिया सर्व्हिस (AIS) च्या प्रमोशन नियमानुसार मिळते. यात एससी, एसटी उमेदवारांना रँक प्रमोशनमध्ये वरिष्ठतेच्या आधारावर प्राधान्य देखील मिळतं. मात्र योग्यता ही वार्षिक परफॉर्मेंस अप्रेजल रिपोर्ट (APAR) च्या आधारे निश्चित होते. या सरकारी दस्तएवजात अधिकाऱ्यांच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही कामांची माहिती नोंदवली जाते. याला अॅन्युएल कॉन्फिडेंशियल रिपोर्ट (ACR) देखील म्हटलं जातं.