नवी दिल्ली : पीटीआय; आरबीएल बँकेचे (रत्नाकर बँक लिमिटेड) व्यवस्थापकीय संचालक (एमडी) तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विश्ववीर आहुजा यांना अखेर पायउतार व्हावे लागले आहे.
आहुजा यांचा रजेचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आणि लगोलग बँकेने राजीव आहुजा यांना तत्काळ प्रभावाने अंतरिम व्यवस्थापकीय संचालक (एमडी) तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्त केले. रिझर्व्ह बँकेने आरबीएल बँक प्रकरणात हस्तक्षेप केल्याने बँक वर्तुळात खळबळ उडाली. दुसरीकडे बँकेची आर्थिक स्थिती सक्षम असल्याचा दावा आरबीएल संचालक मंडळाने रविवारी केला.
दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दुरसंचार खात्याचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश के. दयाल यांची आपल्या वतीने आरबीएल बँक संचालक मंडळावर अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती केली. रिझर्व्ह बँकेकडून संचालक मंडळावरील दयाल यांच्या नियुक्तीचे पत्र आरबीएल बँकेला 24 डिसेंबर रोजी मिळाले. दयाल यांची नियुक्ती 2 वर्षांसाठी करण्यात आली आहे. 23 डिसेंबर 2023 पर्यंत ते या पदावर राहतील.
आरबीएल बँकेच्या संचालक मंडळाने 25 डिसेंबर रोजी विश्ववीर आहुजा यांचा रजा देण्याबाबतचा प्रस्ताव तत्काळ प्रभावाने मंजूर केला होता. तो मंजूर करतानाच बँकेचे विद्यमान कार्यकारी संचालक राजीव आहुजा यांना एमडी आणि सीईओपदी नियुक्त केले होते. आरबीएल बँकेने शनिवारी 'स्टॉक एक्सचेंजस्'ना याबाबतची माहिती पाठवून दिली होती. राजीव आहुजा यांच्या नियुक्तीसाठी दुसरी मंजुरी अद्याप घ्यायची आहे. त्यांच्या निवडीसाठी नियम, अटी आणि वेतनात कुठलाही बदल केला जाणार नाही. संचालक मंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आल्याचेही या माहितीत म्हटले आहे.
चालू वर्षाच्या सुरुवातीला आरबीएल बँकेने रिझर्व्ह बँकेकडे विश्ववीर आहुजा यांच्या तीन वर्षांसाठीच्या नियुक्तीकरिता मंजुरी घेतली होती. रिझर्व्ह बँकेने विश्ववीर आहुजा यांचा कार्यकाळ एक वर्षासाठीच वाढवता येईल, असे स्पष्टही केले होते आणि तशीच परवानगीही दिली होती. तो पूर्ण होण्यापूर्वीच हा सगळा प्रकार घडला.
दरम्यान, बँक सुस्थितीत असल्याचे आरबीएलकडून रिझर्व्ह बँकेला कळविण्यात आले आहे. तसे तपशीलही देण्यात आले आहेत. दुसरीकडे बँकेतील कर्मचार्यांच्या संघटनेने केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र लिहिले असून, बँकेत सगळेच आलबेल नाही. बँकेची वाटचाल येस बँक आणि लक्ष्मी विलास बँकेच्या मार्गाने चाललेली आहे, एकाएकी विश्ववीर आहुजा यांचे पायउतार होणे आणि रिझर्व्ह बँकेकडून दयाल यांची आरबीएल बँक संचालक मंडळावर नियुक्ती होणे या अचानक घडलेल्या नव्या घडामोडींमुळे आमची चिंता अधिक वाढली आहे, असेही कर्मचारी संघटनेने म्हटले आहे. ठेवीदारांच्या हितासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणीही संघटनेने केली आहे. बँकेने रिटेल क्रेडिट, मायक्रो फायनान्सिंग तसेच क्रेडिट कार्डस्मध्ये हात आजमावून स्वत:ची बोटे पोळून घेतल्याचेही सांगण्यात येते.
विश्ववीर आहुजा यांची गणना देशातील अनुभवी बँकर्समध्ये केली जाते. बँकिंगमधील वित्तपुरवठा, जोखमीचे व्यवस्थापन, मनुष्यबळ, व्यवसाय व्यवस्थापनाचा 40 वर्षे अनुभव त्यांना आहे. 'आरबीएल'पूर्वी आहुजा (2001 ते 2009) बँक ऑफ अमेरिकामध्ये भारताचे एमडी आणि सीईओ होते.
शेअर बाजारात 'बिग बुल' अशी ओळख असलेले राकेश झुनझुनवाला तसेच डी मार्टचे संस्थापक संचालक राधाकृष्ण दमाणी यांनी आरबीएल बँकेचे 10 टक्के समभाग खरेदी करण्याची आपली तयारी असल्याचे रिझर्व्ह बँकेकडे बोलून दाखविले आहे.
रिझर्व्ह बँकेने दयाल यांच्या नियुक्तीचा आदेश काढला. यादरम्यान आरबीएल बँकेचे सीईओ विश्ववीर रजेवर गेले अन् बँकेच्या संचालक मंडळाने नवे सीईओ म्हणून राजीव आहुजा यांची नियुक्ती केली. या तिन्ही घटनांचा परस्पर संबंध जोडला जात असून, त्यामुळे शेअर बाजार वर्तुळातही खळबळ उडाली आहे. बँक पुढे कोणत्या दिशेला जाणार, यावर चर्चा सुरू झाली आहे.खासगी बँकेच्या संचालक मंडळात रिझर्व्ह बँक सामान्यतः हस्तक्षेप करीत नाही. रिझर्व्ह बँकेने दयाल यांच्या नियुक्तीचे कारणही स्पष्ट केलेले नाही. एका बँकिंग तज्ज्ञाच्या मते यापूर्वीही रिझर्व्ह बँकेने येस बँक आणि लक्ष्मीविलास बँकेला वाचविले होते. आताही तसेच घडणार असेल तर त्याबद्दल रिझर्व्ह बँकेने पारदर्शकता दाखवायला हवी.
बँकेने आपल्या व्यावसायिक योजना उत्तमरीत्या राबविल्या आहेत. बँकेचे व्यावसायिक धोरण अंमलबजावणीच्या पातळीवर सातत्याने यशाच्या दिशेने वाटचाल करत आहे. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत भांडवलाची पर्याप्तता 16.3 टक्के आहे. लिक्विडिटी कव्हरेज रेश्यो 155 टक्के म्हणजेच उच्च पातळीचा आहे. एनपीए 2.14 टक्के आहे. क्रेडिट डिपॉझिट रेश्यो 74.1 टक्क्यांपर्यंत आहे. लाभाची पातळी 10 टक्के आहे, असे आरबीएल बँकेकडून सांगण्यात आले आहे.
सांगलीचे बाबगोंडा भुजगोंडा पाटील आणि कोल्हापूरचे गंगाप्पा सिद्दप्पा चौगुले यांनी 6 ऑगस्ट 1943 रोजी कोल्हापूर आणि सांगली येथील 2 शाखांसह ही बँक सुरू झाली. आरबीएल बँक पूर्वी रत्नाकर बँक म्हणून ओळखली जात होती. या बँकेचे मुख्यालय सध्या मुंबई येथे आहे.