मुलांचे लसीकरण नको; वैद्यकीय तज्ज्ञांनी मोदींना ट्विट टॅग करून नोंदवला आक्षेप | पुढारी

मुलांचे लसीकरण नको; वैद्यकीय तज्ज्ञांनी मोदींना ट्विट टॅग करून नोंदवला आक्षेप

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मुलांचे लसीकरण करण्याची घोषणा केली असली तरी एम्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी या लसीकरणाला आक्षेप घेतला आहे. ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याची घोषणा मोदी यांनी केली होती मात्र, एम्सचे तज्ज्ञ डॉ. संजय के. राय यांनी मोदी यांच्या घोषणेला आक्षेप घेतला असून हा निर्णय अशास्त्रीय आहे, अशा शब्दांत आक्षेप घेतला.

डॉ. राय हे इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. त्यांनी मोदी यांनी घेतलेला हा निर्णय अशास्त्रीय असून हे पाऊल उचलण्यापूर्वी सरकारने लसीकरणाचा निर्णय घेण्याआधी ज्या देशांत असे लसीकरण झाले आहे त्या देशांच्या डेटाचे विश्लेषण करायला हवे होते, असे म्हटले आहे. राय यांनी याबाबत ट्विट केले असून हे ट्विट पंतप्रधान कार्यालयाला टॅग केले आहे. डॉ. राय यांनी यात म्हटले आहे, ‘मी पंतप्रधान मोदींचा खूप मोठा प्रशंसक आहे. देशासाठी त्यांची निस्वार्थ सेवा आणि योग्य वेळी उचित निर्णय घेतल्यामुळे आपण त्यांचे प्रशंसक आहोत. पण, मुलांच्या लसीकरणाच्या त्यांच्या ‘अशास्त्रीय’ निर्णयामुळे मी पूर्णपणे निराश आहे.’

राय यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, कोणत्याही हस्तक्षेपाचा एक हेतू असावा. त्याचा उद्देश कोरोना संसर्ग किंवा तीव्रता किंवा मृत्यू रोखणे हा आहे. पण आम्हाला लसींविषयी जे ज्ञान आहे त्यानुसार ते संसर्गास मोठी हानी पोहोचवण्यास असमर्थ आहेत. काही देशांमध्ये बूस्टर डोस मिळाल्यानंतरही नागरिकांना संसर्ग होत आहे.’

ब्रिटनमध्ये दररोज ५०,००० नागरिकांना संसर्ग होत आहे. रोज नवे आकडे येत आहेत. त्यामुळे लसीकरणामुळे करोनाचा संसर्ग टाळता येत नाही हे सिद्ध झाले आहे. पण लस संसर्गाची तीव्रता आणि मृत्यू रोखण्यासाठी प्रभावी आहे. करोनामुळे अतिसंवेदनशील लोकसंख्येतील मृत्यूचे प्रमाण सुमारे १.५ टक्के आहे. याचा अर्थ १० लाख लोकसंख्येमागे १५ हजार मृत्यू, असा होतो, असे त्यांनी सांगितलं.

‘लसीकरणाद्वारे आपण यापैकी ८०-९० टक्के मृत्यू रोखू शकतो. म्हणजेच दर १० लाख लोकसंख्येमागे १३ हजार ते १४ हजार मृत्यू टाळता येऊ शकतात. पण लसीकरणानंतर गंभीर दुष्परिणामही दिसून आले आहेत. हा आकडा प्रति १० लाख लोकसंख्येमागे १० ते १५ च्या दरम्यान आहे. लहान मुलांच्या बाबतीत संसर्गाची तीव्रता खूप कमी आहे. सार्वजनिकरित्या जाहीर आकडेवारीनुसार १० लाख लोकसंख्येमागे केवळ २ मृत्यूची नोंद झाली आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा: 

Back to top button