Shocking News: पूर्व परीक्षेत AI बेस टूल्सचा वापर केल्याचा आरोप शाळा प्रशासनानं केला. याबाबत शाळेच्या प्रशासनाकडून विचारणा होताच दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षाच्या विद्यार्थिनीनं आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. यावेळी शाळेनं मानसिक छळ देखील केल्याचा आरोप होतोय.
ही घटना ग्रेटर नोएडा येथे २३ डिसेंबर रोजी घडली. पोलिसांनी सांगितले की, एका विद्यार्थिनीकडे परीक्षा सुरू असताना एक मोबाईल फोन सापडला. या मोबाईल फोनमध्ये ती AI बेस टूल वापरून परीक्षेतील उत्तरे लिहीत असल्याचा आरोप शाळेने केला आहे. शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी याबाबत या विद्यार्थिनीला विचारणा केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या विद्यार्थिनीला पूर्व परीक्षेत मोबाईल फोन वापरल्याबद्दल शाळा प्रशासनानं चौकशीसाठी बोलवलं होतं. त्यावेळी शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी परीक्षेचे नियम मोडल्याप्रकरणी तिला प्रश्न विचारले. शाळेत झालेल्या या घटनेनंतर विद्यार्थिनीनं स्वतःचं जीवन संपवले.
यानंतर या विद्यार्थिनीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वडिलांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर तिच्या मुलीचा मानसिक छळ केल्याचा आणि तिचा सर्वांसमोर अपमान केल्याचा आरोप ठेवला आहे.
ज्या प्रकारे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी त्यांच्या मुलीसोबत हुज्जत घातली त्यामुळं मुलीला भावनिक धक्का बसला. ती तणावाखाली आली. त्यानंतर शाळा प्रशासनावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. त्यांनी मुलीवर टाकलेला दबाव आणि तिच्यावर सर्वांसमोर ओरडल्यामुळं तिनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, शाळा प्रशासनाने काही चुकीचं केलं नसल्याचं सांगितलं आहे. शाळा प्रशासनानं त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शाळा प्रशासनानं सांगितलं की सीबीएसईच्या परीक्षा नियामांनुसार विद्यार्थिनीकडून मोबाईल जप्त करण्यात आला होता. त्यानंतर तिला कडक शब्दात मात्र नियमानुसार विचारणा करण्यात आली होती.
मुख्याध्यापकांनी सांगितलं की विद्यार्थिनीसोबतचं संभाषण अत्यंत छोटं, व्यावसायिक अन् अपमान न करता करण्यात आलं होतं. यावेळी विद्यार्थिनीचा अपमान किंवा शाब्दिक छळ करण्यात आल्याचा दावा मुख्याध्यापकांनी फेटाळला आहे.
पोलिसांनी सांगितलं की शाळेला सीसीटीव्ही फुटेज देण्यास सांगितले होते. त्या प्रमाणे त्यांनी त्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज दिले आहे. हे सीसीटीव्ही फुटेज तापसले जात असून शिक्षक, शाळा कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे देखील जबाब घेतले जात आहेत.