

Attempt to grab old man's house based on fake documents
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : उच्चभू सिडको एन-१ भागात एका ८४ वर्षीय वृद्ध महिलेची फसवणूक करून त्यांचे घर केल्याचा हडपण्याचा प्रयत्न धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट खरेदीखत आणि खोट्या सह्यांच्या आधारे ६५ ते ८५ लाखांचा व्यवहार झाल्याचे भाडेकरूविरुद्ध भासवणाऱ्या एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश हरिशचंद तरटे (३०, रा. सिडको एन-५) असे आरोपीचे नाव आहे.
तक्रारदार कविता पुंडलिक गेडाम (८४) या एन-१, सेक्टर ए भागात आपला मुलगा पारितोष याच्यासोबत राहतात. त्यांच्या पतीच्या निधनानंतर हे घर त्यांच्या नावे झाले आहे. मार्च २०२५ मध्ये त्यांनी घराचा पहिला मजला महेश तरटे (३०) याला १० हजार रुपये महिना दराने भाड्याने दिला होता.
महेश आणि त्याचा मित्र परमेश्वर वाघ हे दोघे भाड्याने राहण्यास आले. १५ ऑक्टोबर रोजी गेडाम कुटुंबीय दिवाळीसाठी ठाणे येथे मुलीच्या घरी गेले असता आरोपी महेश तरटे याने घराचे कुलूप तोडून घरातील टीव्ही, सोफा, कपाट, पलंग आणि महत्त्वाची कागदपत्रे लंपास केली. २६ ऑक्टोबर रोजी कविता यांना घरात काम करणाऱ्या महिलेसह अन्य भाडेकरूने फोन करून तुमच्या घरातील सामान गायब असून, घर रिकामे दिसत असल्याचे सांगितले.
कविता यांनी तात्काळ मुलगा, मुलगी आणि जावयासह घराकडे धाव घेतली. घरी आल्यानंतर त्यांना त्यांचे कुलूप तोडून बाजूला टाकलेले व दाराला नवीन कुलूप असल्याचे दिसले. कविता यांनी एमआयडीसी सिडको पोलिसांकडे धाव घेत प्रकार सांगितला.
बनावट खरेदीखताचा बनाव
एमआयडीसी सिडको पोलिसांनी घरी येऊन आरोपी महेश तरटेला बोलावून घेतले. त्याने हे घर आपण विकत घेतल्याचा दावा केला. त्याने घर बळकावण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याची तक्रार दिल्याने एमआयडीसी सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. त्यानंतर तरटेने कुलूप उघडून सामानही परत आणून दिले. अधिक तपास पोलिस निरीक्षक गीता बागवडे करत आहेत.
म्हणे ८५ लाख देऊन घर घेतले
तरटेने कविता यांच्या मुलीच्या व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या कागदपत्रांमध्ये आरोपीने १०० रुपयांच्या बॉन्ड पेपरवर कविता गेडाम यांच्या बनावट सह्या आणि अंगठा करून बनावट खरेदीखत तयार केले. २०१४ मध्ये (पती हयात असताना) ३० लाख रुपये दिले होते आणि नंतर पुन्हा रोख रक्कम दिल्याचे खोटे दस्तऐवज बनवले. घराची किंमत ८५ लाख ठरल्याचे भासवून कविता गेडाम यांच्या नावाचे बनावट चेकही सिक्युरिटी म्हणून स्वतःकडे ठेवले. नोटरी वकील सी. आर. भारसवाडकर यांच्या नोटरी केलेले दोन बॉण्ड त्याने तयार केले होते. त्यावर साक्षीदार म्हणून चरणसिंग रामचंद्र गुसिंगे (रा. राजेवाडी, बदनापूर) आणि अमोल जयराम साळवे (रा. एन-१) यांची नावे आहेत.