

अमरावती, : आत्याकडे जाण्यास निघालेल्या पत्नीला दुचाकीवर सोडून देण्याचा बहाणा करून पतीने तिला पाण्याने भरून वाहणार्या कॅनॉलमध्ये ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पिंपळखुटा (मोठा) जवळ घडली. मात्र, कॅनॉलमधील एका झाडाचा आधार मिळाल्याने महिलेचे प्राण थोडक्यात वाचले. या प्रकरणी तिवसा पोलिसांनी (दि.२५) आरोपी पतीसह एका अल्पवयीन बालकास ताब्यात घेतले आहे.
शिवा सवले (रा. करजगाव) व एक १७ वर्षीय अल्पवयीन बालक अशी आरोपींची नावे असून ही घटना तिवसा शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपळखुटा (मोठा) नजीक घडली. प्राप्त माहितीनुसार, पती-पत्नी काही कारणांमुळे वेगवेगळे राहत होते. मात्र त्यांचा मोबाईलवर संपर्क सुरू होता. दरम्यान, २१ वर्षीय पत्नी आकोट येथील आत्याकडे जाणार असल्याचे तिने पतीला सांगितले. यावर आरोपी पती शिवा याने तिला स्वतः दुचाकीवर सोडून देण्याची तयारी दर्शवली.
सातरगाव मार्गे जात असताना पिंपळखुटा नजीकच्या कॅनॉलजवळ आरोपीने दुचाकी थांबवली. त्यानंतर अल्पवयीन बालकाच्या मदतीने महिलेचे हात-पाय पकडून तिला वाहत्या कॅनॉलमध्ये ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र कॅनॉलमध्ये पडताच काही अंतरावर असलेल्या झाडाचा आधार तिला मिळाल्याने तिचा जीव वाचला.
कॅनॉलमधून बाहेर आल्यानंतर पीडित महिला जवळील शेतातील एका नागरिकांकडे मदतीसाठी गेली. त्यानंतर तिने तिवसा पोलीस ठाण्यात पोहोचत संपूर्ण हकिकत सांगत घटनेची तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून तिवसा पोलिसांनी आरोपी पतीसह अल्पवयीन बालकास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अमोल मुडे करीत आहेत.