Former SC Judge Markandey Katju launches Ishq Karo Party : सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’ची (CJP) जोरदार चर्चा सुरू असतानाच, ‘इश्क करो पार्टी’ नावाचा डिजिटल इनिशिएटिव्ह सुरू केल्याची घोषणा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी 'एक्स' पोस्टद्वारे केली आहे. ज्यांना या मोहिमेत सामील व्हायचे आहे, त्यांनी अधिकृत ई-मेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
माजी न्यायमूर्ती काटजू यांच्या आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, हे व्यासपीठ लोकांना युद्ध किंवा द्वेष नाही, तर एकमेकांवर प्रेम करण्यासाठी प्रोत्साहित करेल. आपल्या या नव्या मोहिमेबाबत काटजू यांनी एक्सवर अनेक पोस्ट केल्या आहेत. त्यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, " मी नव्याने स्थापन झालेल्या ‘इश्क करो पार्टी’मध्ये ज्यांना सामील व्हायचे आहे, त्यांनी ishqkaroparty@gmail.com वर संपर्क साधावा."
आपल्या दुसऱ्या एका पोस्टमध्ये काटजू यांनी म्टहलं आहे की, या मोहिमेला विनोद समजणार्यांचा मोठा गैरसमज झाला आहे. काही लोकांना वाटू शकते की नव्याने तयार केलेली 'इश्क करो पार्टी' हा एक विनोद आहे.तरुण-तरुणीमधील प्रेमसंबंधांना चालना देण्यासाठी 'व्हॅलेंटाईन डे'सारखा सुरू केलेला एखादा उपक्रम आहे; पण हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे."
"वास्तविक पाहता, भारतासमोरील गंभीर समस्यांशी लढण्याचा हा एक प्रामाणिक आणि गंभीर प्रयत्न आहे. आज भारतात प्रचंड गरिबी, मोठी बेरोजगारी, मुलांमधील कुपोषणाची भयावह स्थिती (ग्लोबल हंगर इंडेक्सनुसार भारतातील जवळपास प्रत्येक दुसरे मूल कुपोषित आहे आणि अलीकडच्या वर्षांत ही परिस्थिती आणखी बिघडली आहे), चांगल्या आरोग्य सेवा आणि दर्जेदार शिक्षणाचा अभाव, जीवनावश्यक वस्तूंची वाढती महागाई, जातीय आणि धार्मिक तणाव यांसारख्या अनेक गंभीर समस्या आहेत," असेही काटजू यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
"या अथांग समस्यांचे निवारण तोपर्यंत शक्य नाही, जोपर्यंत आपल्या लोकांमध्ये एकता निर्माण होत नाही. परंतु, खेदाची गोष्ट म्हणजे आज आपला समाज जात, धर्म आणि वंशाच्या नावावर विभागला गेला आहे. ही दरी स्वार्थी राजकारण्यांकडून अधिक रुंदावली जाते, ज्यांना केवळ सत्ता आणि पैसा हवा आहे आणि जनतेच्या खऱ्या कल्याणाऐवजी ते आपल्या व्होट बँकेचे राजकारण करत आहेत," असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
"इश्क करो पार्टीचा उद्देश या अनिष्ट प्रवृत्तीचा मुकाबला करणे आणि लोकांमध्ये एकता वाढवणे हा आहे. जात, धर्म, वंश किंवा कोणतीही ओळख बाजूला ठेवून आपण आपल्या सर्व देशवासीयांवर प्रेम केले पाहिजे. केवळ अशाच भावनेतून आपण आधुनिक विचारांच्या नेतृत्वाखाली एक शक्तिशाली जनसंघर्ष उभा करू शकू, जो आपल्या जनतेला या कठीण परिस्थितीतून बाहेर काढू शकेल. याच महान उद्देशासाठी 'आयकेपी' (IKP) भारतीय जनतेचे मार्गदर्शन करू इच्छिते आणि हेच या पार्टीचे मूळ ध्येय आहे," असेही त्यांनी म्हटलं आहे.
आपल्या एका पोस्टमध्ये त्यांनी 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, अभिजीत दीपके हे मूर्ख आहेत. याचा पुरावा त्यांच्या मुख्य मागण्यांपैकी एका मागणीवरूनच मिळतो. ते भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, तर त्यांच्या जागी दुसरा कोणीतरी मंत्री येईल. अशा परिस्थितीत याने नक्की काय फरक पडणार?, असा सवालही त्यांनी केला आहे.
विविध स्पर्धा परीक्षांमधील घोटाळे आणि गोंधळानंतर अभिजीत दीपके यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. या मागणीसाठी त्यांनी ६ जून रोजी जंतर-मंतरवर आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनात शेकडो सीजेपी (CJP) समर्थकांनी भाग घेतला होता. मात्र, त्यांच्या मागण्यांवर सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, अभिजीत दीपके यांनी पुढेही आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. मात्र, याच काळात त्यांना 'तगडी स्पर्धा' देण्यासाठी आता एक नवीन पार्टी रिंगणात उतरली आहे.