Mamata Banerjee on TMC Rebel Leaders : तृणमूल काँग्रेस (TMC) सोडणाऱ्या अनेक बंडखोर नेत्यांनी अभिषेक बॅनर्जी यांच्यावर मनमानी कारभाराचे आरोप केले असतानाच, पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी बुधवारी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या आहेत. ममता यांनी 'गद्दारांच्या वतीने' जनतेची माफी मागितली आणि आपण किंवा आपल्या कुटुंबाने राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी कधीही तडजोड केली नसल्याचा दावा करत "माझ्या पुतण्याला पक्षावर हल्ला करण्यासाठी केवळ एक 'निमित्त' बनवले गेले आहे. मला हार्ट अटॅक यावा अशी त्यांची इच्छा आहे, पण जोपर्यंत मी तुमचा अंत पाहत नाही, तोपर्यंत मी जिवंत राहीन." अशा शब्दांमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधला.
'फेसबुक' लाईव्हच्या माध्यमातून पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "अभिषेक बॅनर्जी यांना फक्त एक निमित्त बनवले गेले आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना समन्स बजावण्यात आले. जर त्यांना हवे असते तर ते दिलासा मिळवू शकले असते, परंतु ते मैदान सोडून पळाले नाहीत. त्यांनी ज्या प्रकारे लढा सुरू ठेवला, त्याने त्यांच्या सर्व त्रुटी माफ झाल्या आहेत."
गेल्या काही आठवड्यांत ममता बॅनर्जी यांची साथ सोडणाऱ्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी अभिषेक बॅनर्जी यांच्यावर पक्ष हुकूमशाही पद्धतीने चालवल्याचा आणि भीतीचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप केला होता. या पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर निशाणा साधत ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मी गद्दारांच्या वतीने लोकांची माफी मागते. राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी मी माझा 'विवेक' विकलेला नाही."
तडजोड करण्यास नकार दिल्यामुळेच आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला सतत राजकीय छळाचा सामना करावा लागला, असा आरोप माजी मुख्यमंत्र्यांनी केला. त्या म्हणाल्या, "जर मी तडजोड केली असती, तर आम्हाला एवढा त्रास सहन करावा लागला नसता. ज्यांनी तडजोड केली आहे, त्यांचे स्वतःचे काही आग्रह आणि दुराग्रह आहेत." असा आरोपही त्यांनी केला.
भाजप तपास यंत्रणा आणि पोलिसांचा वापर करून नेत्यांना पक्षांतर करण्यास भाग पाडत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्र्यांनी केला. अनेक नेते केवळ भीतीपोटी दुसऱ्या पक्षात गेल्याचा दावा त्यांनी केला. ममता म्हणाल्या, "लोकसभा आणि राज्यसभेत आमचे अजूनही १८ खासदार आहेत. जे खासदार 'सेटिंग कंपनी'त सामील झाले आहेत, ते पोलिसांच्या भीतीपोटी तसे करत आहेत."
ममता यांनी भाजपचे नाव न घेता सांगितले की, तृणमूल काँग्रेस सोडणारे नेते भाजपच्या 'वॉशिंग मशीन'मध्ये आणि भाजप पुरस्कृत तृणमूलच्या बंडखोर गटात जात आहेत. त्या म्हणाल्या, "जी व्यक्ती (मदन मित्रा) आज गेली, तिने कालच आम्हाला सांगितले होते की तिला आणि तिच्या कुटुंबाला समन्स मिळाले आहे. तेव्हाच आम्हाला समजले होते की ते पक्ष बदलू शकतात. ज्यांची 'सेटिंग' आहे, ते भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये जात आहेत."