

Mamata Banerjee on TMC Crisis : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर एकापाठोपाठ एक धक्के बसत असूनही ममता बॅनर्जी अजूनही आक्रमक भूमिकेत आहेत. पक्षाच्या ८० पैकी बहुतांश आमदारांनी ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली वेगळा गट स्थापन केला आहे, तर लोकसभा खासदारांनी तिसरा गट तयार केला आहे. यामुळे 'खरी तृणमूल काँग्रेस कोणाची?' यावरून संघर्ष सुरू झाला आहे. अशातच, ममता बॅनर्जी यांनी आपल्या राजकीय विरोधकांना थेट आव्हान दिले असून, "मला थांबवायचे असेल, तर तुम्हाला मला मारावे लागेल," असे म्हटले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही विरोधी गटांना ६ जुलै रोजी संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत आपापले दावे आणि प्रतिदावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
बॅनर्जी यांनी सांगितले की, तृणमूलचे अधिकृत चिन्ह त्यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या गटाकडेच राहील. त्यांच्या या विधानावरून बंडखोरांना आगामी काळात प्रदीर्घ कायदेशीर लढाईला सामोरे जावे लागू शकते, असे संकेत मिळत आहेत. त्या म्हणाल्या, "पक्षाचे चिन्ह कुठेही जाणार नाही. जर तुम्हाला मला थांबवायचे असेल, तर तुम्हाला माझा जीव घ्यावा लागेल."
शनिवारी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का बसला. पक्षाच्या बंगाल प्रदेशाध्यक्ष आणि अद्याप त्यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या मोजक्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या चंद्रिमा भट्टाचार्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. भट्टाचार्य या विधानसभेचे विरोधी पक्षनेते ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटात सामील झाल्या आहेत. ऋतब्रत यांच्या समर्थकांनी शुक्रवारी कोलकाता येथील पक्षाच्या मुख्य कार्यालयावर ताबा मिळवला होता.यावर बोलताना ममता म्हणाल्या, "चंद्रिमा भट्टाचार्य यांनी आज राजीनामा दिला आहे. त्यांनी मला आधीच परिस्थितीची कल्पना दिली होती की त्या राजीनामा देणार आहेत, कारण त्यांच्या मुलाने यापूर्वीच तृणमूल विरोधी गटाशी हातमिळवणी केली होती."
माजी मुख्यमंत्र्यांनी बंडखोरांच्या गटात सामील होण्यास स्पष्ट नकार दिला असून, बंडखोरांनी त्यांना देऊ केलेली 'सल्लागार' भूमिकाही फेटाळली आहे. "तो निर्णय घेण्यास त्या (चंद्रिमा) स्वतंत्र आहेत, पण मी बंडखोरांशी कधीही हातमिळवणी करणार नाही. मी भाजपसमोर झुकणार नाही आणि माझा पक्षही कोणत्याही दबावापुढे वाकणार नाही," असे त्यांनी ठामपणे सांगितले.
बंडखोरांनी तृणमूलच्या कार्यालयावर ताबा मिळवल्याच्या मुद्द्यावरही बॅनर्जी यांनी भाष्य केले. "ज्यांनी काल तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन त्याला टाळे ठोकले, त्यांना मी सांगू इच्छिते की: आम्ही ते कार्यालय भाड्याने घेतले होते. ऑक्टोबर २०२७ पर्यंत त्याचा करार आहे. एखादी व्यक्ती पक्ष सोडू शकते, पण त्यामुळे संस्था संपुष्टात येत नाही. ती पक्षाची मालमत्ता आहे. मी त्यावर थेट ताबा मिळवू शकत नाही, आणि 'मा, माती, मानुष'च्या मालमत्तेवर कोणीही जबरदस्तीने ताबा सांगू शकत नाही," असे त्या म्हणाल्या.
"पक्षाचे चिन्ह मी दिले आहे. २०२६ च्या निवडणुकीत तुमच्या उमेदवारी अर्जांवर स्वाक्षरी करणारी मीच होते. निवडणूक होऊन दोन महिनेही झाले नाहीत, तोच तुम्ही गद्दार कसे झालात? याला काहीतरी मर्यादा असायला हवी. तुम्ही सध्या भाजपसोबत आहात, जे जास्त काळ चालणार नाही, कारण तृणमूलची विचारसरणी भाजपविरोधी आहे," असेही ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. चंद्रिमा यांच्या एक्झिटनंतर त्यांनी राष्ट्रीय आणि राज्य दोन्ही स्तरांवर पक्षाची धुरा स्वतःच्या हाती घेतली असल्याचे सांगितले. तसेच, त्यांच्या निवासस्थानी असलेले पक्षाचे कार्यालय हेच आता मुख्य तृणमूल कार्यालय म्हणून काम करेल, अशी घोषणाही त्यांनी केली.
बंगाल निवडणुकीत पक्ष आणि ममता बॅनर्जी यांच्या पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमधील गळती सुरू झाली. बंडखोर आमदारांनी ममता यांच्या नेतृत्वशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असले, तरी त्यांचा हा विरोध प्रामुख्याने त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्या पक्षातील भूमिकेवर होता, असे संकेत मिळत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्षातून आतापर्यंत ६० हून अधिक आमदार, २० हून अधिक लोकसभा खासदार आणि किमान ३ राज्यसभा खासदारांनी वेगळे होण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही विरोधी गटांना ६ जुलै रोजी संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत आपापले दावे आणि प्रतिदावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.