Mahua Moitra dog Henry : खा. मोईत्रा आणि लाडका 'हेन्री'...एक्स बॉयफ्रेंडकडील कुत्र्याला भेटण्याचा फैसला आता हायकोर्ट घेणार!

एकाला हवाय 'हेन्री'चा ताबा, तर दुसऱ्याचा 'शेअरिंग'ला विरोध, पुढील आठवड्यात होणार सुनावणी
Mahua Moitra dog Henry
Mahua Moitra dog Henry Pudhari
Published on
Updated on

Mahua Moitra dog Henry : तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांना त्यांचा लाडका पाळीव कुत्रा 'हेन्री' याला भेटता येणार की नाही, याचा निर्णय आता दिल्ली उच्च न्यायालय घेणार आहे. रॉटवाईलर प्रजातीचा कुत्रा सध्या महुआ मोईत्रा यांचे माजी प्रियकर आणि वकील जय अनंत देहाद्रई यांच्याकडे आहे. यापूर्वी न्यायालयाने दोघांनाही आपापसात चर्चा करून सामोपचाराने तोडगा काढण्यास सांगितले होते; मात्र महुआ मोईत्रा आणि देहाद्रई यांच्यात 'हेन्री'च्या भेटीबाबत कोणताही समझोता होऊ शकला नाही. दोघांमधील ही तडजोड अपयशी ठरल्याने, न्यायमूर्ती जसमीत सिंग यांनी या प्रकरणाचा निर्णय न्यायालयावर सोपवला असून, पुढील आठवड्यात यावर अधिकृत सुनावणी केली जाणार आहे.

एकाला हवाय 'हेन्री'चा ताबा, तर दुसऱ्याचा 'शेअरिंग'ला विरोध

खासदार महुआ मोईत्रा आणि वकील जय अनंत देहाद्रई यांच्यातील 'हेन्री' (रॉटवाईलर कुत्रा) याच्या मालकी हक्काचा वाद मागील काही वर्षे न्यायालयात सुरू आहे. महुआ मोईत्रा यांनी दर महिन्याला किमान १० दिवसांसाठी 'हेन्री'चा तात्पुरता ताबा मिळावा म्हणून कनिष्ठ न्यायालयात मागणी केली होती. ही मागणी कनिष्ठ न्यायालयाने फेटाळली. या निर्णयाविरोधात मोईत्रा यांनी आता उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. दुसरीकडे, मोईत्रा यांनी कुत्र्याच्या 'सामायिक ताब्या'साठी केलेल्या याचिकेला पूर्णपणे फेटाळावे, अशी देहाद्रई यांची मागणी होती. परंतु, कनिष्ठ न्यायालयाने देहाद्रई यांची ही मागणी फेटाळल्यामुळे, अब देहाद्रई यांनीही त्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. परिणामी, लाडक्या पाळीव कुत्र्यासाठी या दोघांमध्ये आता उच्च न्यायालयातच कायदेशीर लढाई सुरू आहे.

Mahua Moitra dog Henry
Mahua Moitra: सत्तेनंतरच 'भावा'चे स्मरण! महुआ मोइत्रांही सोडणार ममता बॅनर्जींची साथ? एका विधानाने प. बंगालमध्‍ये चर्चेला उधाण

"यात काय अडचण आहे?" : उच्च न्यायालय

'बार अँड बेंच'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, यापूर्वी ७ जुलै रोजी उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंना चर्चा करून असा मार्ग काढण्यास सांगितले होते, ज्यामुळे मोईत्रा यांना हेन्रीला भेटता येईल. ७ जुलै रोजी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती सिंग म्हणाले होते, "यात काय अडचण आहे? महुआ मोईत्रा यांना उद्यानात पाळीव कुत्रा हेन्रीला एक तास भेटू द्या. मी एका स्थानिक आयुक्तांची नियुक्ती करेन, जे श्वानाला घेऊन जातील आणि पुन्हा तुमच्याकडे आणून सोडतील. मी ही व्यवस्था उद्यासाठी ठेवतो. त्यांना आठवड्यातून पाच तास वेळ द्या, विषय संपला."

Mahua Moitra dog Henry
Mamata Banerjee Political Career: आव्हानांच्या गर्तेत ममतादीदी

"भेटीचा अधिकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही"

बुधवारी या प्रकरणाची उच्च न्यायालयात सुनावणी झाली, तेव्हा न्यायमूर्ती सिंग यांनी देहादराई यांचे वकील, ज्येष्ठ विधीज्ञ पर्सिव्हल बिलिमोरिया यांना विचारले की, ते मोइत्रा यांना श्वानाला भेटण्याचा अधिकार देण्यास तयार आहेत का? त्यावर बिलिमोरिया यांनी उत्तर दिले, "यात प्रश्नच उद्भवत नाही. कारण यामागे एक ठोस कारण आहे. श्वानाच्या हितासाठी मला स्पष्टीकरण देण्याची परवानगी द्यावी. मला धमकावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. बाराखंभा रोड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी पाच कॉन्स्टेबलसह माझ्याकडे आले होते. त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. हे थेट गुन्हेगारी धमकीचे प्रकरण आहे."

Mahua Moitra dog Henry
TMC Crisis: तृणमूल काँग्रेसमध्ये दोन नाही तर आहेत तीन गट... तिसरा 'सायलेंट' किलर गट बंगालचं राजकारण फिरवणार?

आता सुनावणी पुढील आठवड्यात निश्चित

दुसरीकडे, मोइत्रा यांची बाजू मांडणाऱ्या ज्येष्ठ वकील श्येल त्रेहान यांनी न्यायालयात सांगितले की, ती तक्रार आधीच मागे घेण्यात आली आहे. न्यायालयाने पुन्हा बिलिमोरिया यांना विचारले की ते कोणत्याही तडजोडीस तयार आहेत का? यावर बिलिमोरिया म्हणाले, "माय लॉर्ड, यामागे कारण आहे. जर मला सांगू दिले तर..." मात्र, न्यायालयाने स्पष्ट केले की ते आता दोन्ही बाजू ऐकून घेऊनच यावर निर्णय देतील. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी पुढील आठवड्यात निश्चित केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news