विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज एलपीजी संकटावरुन लोकसभेत सरकारवर निशाणा साधला. sansad tv
राष्ट्रीय

LPG Crisis Debate|संसदेत LPG संकटावर चर्चा, राहुल गांधींनी व्‍यक्‍त केली 'भीती'; पेट्रोलियन मंत्री पुरींनी दिले प्रत्युत्तर

LPG Crisis Debate| कोणाकडे तेल खरेदी करायचे हे सांगणारे अमेरिका कोण? राहुल गांधींनी साधला सरकारवर निशाणा

पुढारी वृत्तसेवा

LPG Crisis Debate

नवी दिल्‍ली : 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' (होर्मुजची सामुद्रधुनी) बंद आहे. देशात एलपीजीबाबत संकट निर्माण झाले असून याचा सर्वाधिक फटका फेरीवाल्यांना बसला आहे. आपण कोणाकडून तेल खरेदी करायचे आणि कोणाकडून गॅस खरेदी करायचा, हे सांगणारा अमेरिका कोण? यामुळे छोटे व्यापारी त्रस्त होत आहेत, अशा शब्‍दांमध्‍ये आज (दि. १२) विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत सरकारवर निशाणा साधला. दरम्‍यान, भारतातील ३३ कोटी कुटुंबांच्या स्वयंपाकघरात कोणत्याही प्रकारची (इंधनाची) कमतरता भासू नये, याला केंद्र सरकारचे सर्वोच्‍च प्राधान्‍य असल्‍याचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी प्रत्‍युत्तर दिले.

एलपीजीबाबत लोकांमध्ये घबराट

राहुल गांधी संसदेत म्हणाले की, अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचे दूरगामी परिणाम होणार आहेत. जगातील सुमारे २० टक्के तेल होर्मुज सामुद्रधुनीतून जाते, तो मुख्य सागरी मार्ग बंद करण्यात आला आहे. याचा मोठा परिणाम होईल, विशेषतः आपल्या देशावर, कारण आपल्या तेल आणि नैसर्गिक वायूचा मोठा हिस्सा याच मार्गाने येतो. अडचणींना आता कुठे सुरुवात झाली आहे. रेस्टॉरंट्स बंद होत आहेत. एलपीजीबाबत लोकांमध्ये घबराट पसरत आहे. रस्त्यावर सामान विकणारे लोक प्रभावित होत आहेत आणि मी म्हटल्याप्रमाणे, ही तर फक्त सुरुवात आहे.

ट्रम्प यांच्या विधानावरून राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल

कोणत्याही देशाचा पाया त्याची ऊर्जा सुरक्षा असतो आणि मी ही गोष्ट हलक्यात घेत नाहीये. पण आपण कोणाकडून तेल खरेदी करायचे, कोणाकडून गॅस खरेदी करायचा, आपण रशियाकडून तेल खरेदी करू शकतो की नाही आणि विविध तेल पुरवठादार देशांशी आपले संबंध कसे असतील, हे ठरवण्याचे अधिकार जणू अमेरिकेला कराराद्वारे देऊन टाकले आहेत, असा दावाही त्‍यांनी केला. ट्रम्प यांच्या विधानावरून मोदी सरकारवर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले की, "भारतासारखा मोठा देश आपण कोणाकडून तेल खरेदी करायचे हे दुसऱ्या देशाने का ठरवू द्यावे, हे माझ्यासाठी नेहमीच गोंधळात टाकणारे राहिले आहे. रशियाकडून तेल खरेदी करायचे की नाही आणि आपले आंतरराष्ट्रीय संबंध कसे असतील, याची परवानगी दुसऱ्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्याला का द्यावी? हे माझ्यासाठी एक कोडे आहे आणि मी हे कोडे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे."

राहुल गांधींनी उपस्थित केला एपस्टीनचा मुद्दा

राहुल गांधी म्हणाले, "मी हे कोडे आता समजून घेतले आहे आणि हे कोडे एका कराराशी संबंधित आहे. येथे आपल्यामध्ये एक गृहस्थ बसले आहेत जे पेट्रोलियम मंत्री आहेत. त्यांनी स्वतः सांगितले आहे की ते मिस्टर एपस्टीन यांचे मित्र आहेत...". गांधी पुढे म्हणाले की, माझ्याकडे एक दस्तऐवज आहे ज्यातून असे दिसून येते की त्यांच्या (पुरींच्या) मुलीला जॉर्ज सोरोस यांच्याकडून पैसे मिळाले आहेत. राहुल गांधींच्या याच विधानावरून लोकसभेत मोठा गदारोळ झाला. सत्ताधारी पक्षाच्या बाकांवरून घोषणाबाजी सुरू झाली. सभापतींनी राहुल गांधींना रोखत म्हटले की, "तुम्ही नोटीस काही वेगळीच दिली आहे. नोटिशीवर बोला, नियमाबाहेर जाऊन बोलण्याची परवानगी कोणालाही दिली जाणार नाही."

'जगाला कधीही अशा परिस्थितीचा सामना करावा लागला नाही' : पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी

लोकसभेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पश्चिम आशियातील संकटानंतर देशातील गॅस टंचाईच्या मुद्द्यावर भाष्य केले. ते म्हणाले की, जगाच्या ऊर्जा इतिहासात क्वचितच असा काळ आला असेल, जो सध्या पश्चिम आशियातील संकटामुळे पाहायला मिळत आहे. जागतिक तेल आणि वायू पुरवठ्यासाठी ही स्थिती अत्यंत गंभीर मानली जात आहे.

'होर्मुजमधून २० टक्के वाहतूक प्रभावित'

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, "होर्मुजमधून २० टक्के वाहतूक प्रभावित झाली आहे, ४० टक्के कच्चे तेल इतर देशांतून येत आहे." यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, आपल्याकडे पुरेसे कच्चे तेल उपलब्ध आहे. केंद्रीय मंत्र्यांनी पुढे माहिती दिली की, भारताचा कच्च्या तेलाचा पुरवठा पूर्णपणे सुरक्षित असून भारतात पेट्रोल-डिझेलची कोणतीही अडचण नाही; देशात सध्या पुरेसा गॅस उपलब्ध आहे. गॅस टंचाईबाबतच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री म्हणाले की, सीएनजीचा पुरवठा १०० टक्के सुरू आहे आणि भारतात एलएनजीचे कार्गो दररोज येत आहेत. गॅस सिलेंडरबाबत कोणत्याही प्रकारे घाबरून जाण्याची (पॅनिक होण्याची) गरज नाही, घबराटीमुळेच मागणी वाढली आहे.

'संकटाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार'

यावेळी केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी सांगितले की, देशात एलपीजीचे उत्पादन २८ टक्क्यांनी वाढले असून देश दीर्घकाळ या संकटाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. पेट्रोलियम मंत्री पुढे म्हणाले की, भारत अजूनही कॅनडा, नॉर्वे आणि रशियाकडून तेल घेत आहे आणि आम्ही गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी निर्देश जारी केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT