

मुंबई: लहान आणि मध्यम हॉटेल्स व रेस्टॉरंट्सकडे साठा मर्यादित असल्याने गॅस तुटवड्याचा सर्वप्रथम आणि सर्वाधिक फटका त्यांना बसेल. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यसेवा अखंड सुरू राहण्यासाठी व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा तातडीने पुन्हा सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे, असे फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट ऑफ इंडियाचे (एफएचआरएआय) उपाध्यक्ष आणि हॉटेल अँड रेस्टॉरंट अससोसिएशनचे (वेस्टर्न इंडिया) प्रवक्ते प्रदीप शेट्टी यांनी सांगितले.
सध्या मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या शहरांमधून गॅसच्या गंभीर तुटवड्याच्या तक्रारी येत आहेत. पुढील दोन दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर मुंबईत जवळपास 50 टक्के हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना त्यांच्याजवळ असलेल्या गॅस साठ्यावर अवलंबून राहून हॉटेल किंवा रेस्टॉरंट तात्पुरते बंद करावे लागू शकते. परिणामी याचा फटका आधीच भारतात आलेल्या तसेच पुढील काळात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांनाही बसू शकतो. लहान आणि मध्यम हॉटेल्स व रेस्टॉरंट्सकडे गॅसचा साठा मर्यादित असल्याने या तुटवड्याचा सर्वप्रथम आणि सर्वाधिक परिणाम त्यांना होण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.
हॉस्पिटॅलिटी क्षेत्र हे दररोज लाखो लोकांना सेवा देणारे एक महत्त्वाचे आणि अत्यावश्यक क्षेत्र आहे. कोविड महामारीच्या काळातही या क्षेत्राला अत्यावश्यक सेवांचा दर्जा देण्यात आला होता. त्यामुळे शहरांमधील अन्नपुरवठा व्यवस्थेत या क्षेत्राचे महत्त्व आजही तितकेच कायम आहे, असे प्रदीप शेट्टी म्हणाले.
गेल्या आठवड्यापासून व्यावसायिक एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा भासत आहे. सुरुवातीला खंडित होणारा गॅसचा पुरवठा आता अनेक भागांत जवळपास पूर्णपणे थांबला आहे. केंद्र सरकारने 5 मार्च रोजी काढलेल्या अधिसूचनेनंतर पुरवठादार आणि वितरकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यसेवा केंद्रांना व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा पुरवठा थांबवला आहे.
इलेक्ट्रिक किंवा इंडक्शनवर स्वयंपाक करण्याचे पर्याय उपलब्ध होत असले तरी भारतीय पदार्थ जलद आणि जास्त आचेवर बनवावे लागतात. त्यामुळे सध्या हे पर्याय पूर्णपणे योग्य ठरू शकत नाही. अशा प्रणालींकडे वळण्यासाठी खर्च मोठा लागतो आणि पायाभूत सुविधांमध्येही मोठे बदल करावे लागतात. सध्या उद्योगासमोर दुसरा व्यवहार्य पर्याय नाही, असे शेट्टी यांनी सांगितले.