राष्ट्रीय

Digvijay Singh X post : "हीच संघटनेची ताकद ..." : दिग्विजय सिंह यांनी'X'वर शेअर केला PM मोदींचा जुना फोटो

पक्षश्रेष्ठींना 'टॅग' करत 'भाजप-आरएसएस'च्या शिस्तीचे कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

दिग्‍विजय सिह यांनी काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांना काँग्रेसमध्‍ये संघटनात्‍मक सुधारणांची गरज व्यक्त करणारे पत्र लिहिले होते.

Digvijay Singh X post

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ९० च्या दशकातील एक जुना फोटो शेअर करत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) कौतुक केले आहे. काँग्रेसमध्ये संघटनात्मक सुधारणांची गरज व्यक्त करणारे पत्र राहुल गांधींना लिहिल्यानंतर आठवडाभरातच सिंह यांनी हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

दिग्‍विजय सिंह यांनी नेमकी कोणती पोस्‍ट केली?

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी 'Quora' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एक स्क्रीनशॉट 'X' वर शेअर केला आहे. या ब्‍लॅक अँड व्‍हाईट फोटोमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एल.के. अडवाणी गुजरातमध्ये एका कार्यक्रमात दिसत असून, तरुण नरेंद्र मोदी त्यांच्या जवळ जमिनीवर बसलेले दिसत आहेत.

हा फोटो खूपच प्रभावी आहे.....

हा फोटो शेअर करताना दिग्‍विजय सिंह यांनी लिहिले की, "हा फोटो खूपच प्रभावी आहे. ज्या पद्धतीने संघाचे सामान्य स्वयंसेवक आणि जनसंघाचे कार्यकर्ते नेत्यांच्या चरणांशी जमिनीवर बसतात आणि पुढे जाऊन राज्याचे मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान होतात, ही त्या संघटनेची ताकद आहे. जय सिया राम."

भाजप प्रवक्‍ते म्‍हणाले, हा तर 'ट्रुथ बॉम्ब'

सिंह यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांचा फोटो एक्‍सवर पोस्‍ट केल्‍यानंतर भाजपला काँग्रेसवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. भाजप प्रवक्ते सी.आर. केशव यांनी याला 'ट्रुथ बॉम्ब' (सत्याचा स्फोट) म्‍हटलं आहे. "दिग्विजय सिंह यांच्या टिप्पणीने काँग्रेसमधील हुकूमशाही आणि अलोकतांत्रिक नेतृत्वाचा बुरखा फाडला आहे. गांधी घराणे कशा प्रकारे पक्ष चालवते हे यातून स्पष्ट झाले असून, राहुल गांधी आता यावर प्रतिक्रिया देण्याचे धाडस दाखवतील का?", असा सवालही त्‍यांनी केला आहे.

पक्षश्रेष्ठींना स्पष्ट संकेत?

दिग्विजय सिंह यांनी आपल्या पोस्टमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना टॅग केले आहे. त्यामुळे हा पक्षश्रेष्ठींना दिलेला एक सूचक संदेश असल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात रंगली आहे. १९ डिसेंबर रोजी सिंह यांनी काँग्रेसमध्ये सत्तेच्या विकेंद्रीकरणाची आणि संघटनात्मक बदलांची मागणी केली होती. तसेच "राहुल गांधींना पटवून देणे सोपे नसते," अशी खंतही त्यांनी व्‍यक्‍त केली होती

दिग्विजय सिंह यांच्‍या आक्रमक पवित्रा का घेतला?

दिग्विजय सिंह यांच्या या भूमिकेकडे त्यांच्या राजकीय भविष्याशी जोडूनही पाहिले जात आहे. त्यांची राज्यसभेची दुसरी टर्म पुढील वर्षी संपत असून, त्यांना तिसऱ्यांदा संधी मिळण्याची शक्यता धूसर आहे. मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये कमलनाथ आणि मीनाक्षी नटराजन यांच्यासह जीतू पटवारी आणि उमंग सिंघार यांसारख्या 'दिग्विजय विरोधी' नेत्यांचे वर्चस्व वाढत असल्याने सिंह यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT