

नवी दिल्ली: राष्ट्रवादाचे स्वयंघोषित रक्षक असल्याचा दावा करणाऱ्या आरएसएस आणि भाजपने त्यांच्या शाखा किंवा कार्यालयांमध्ये कधीही वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत किंवा जन गण मन हे राष्ट्रगीत गायले नाही. त्याऐवजी ते “नमस्ते सदा वत्सले” गातात. तर प्रत्येक काँग्रेस बैठकीत आणि पक्षाच्या कार्यक्रमात वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत आणि जन गण मन हे राष्ट्रगीत कायम गायले जातात, असे म्हणत मल्लिकार्जुन खर्गे यांनी आरएसएस आणि भाजपवर टीकास्त्र सोडले.
भारताचे राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्षपुर्तीनिमित्त काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एक पत्र शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी रचलेले वंदे मातरम् भारताच्या अमर आत्म्याचा आवाज आहे. हे गीत स्वातंत्र्यलढ्यात प्रेरणास्रोत ठरले आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम गायल्याचेही मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, वंदे मातरम गीताच्या लोकप्रियतेमुळे ब्रिटिशांनी घाबरून त्यावर बंदी घातली कारण ते भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे हृदय बनले होते. १९१५ मध्ये महात्मा गांधींनी लिहिले की, फाळणीच्या काळात वंदे मातरम हे बंगालमधील हिंदू आणि मुस्लिमांमधील सर्वात शक्तिशाली युद्धगीत बनले. १९३७ मध्ये, उत्तर प्रदेश विधानसभेने पुरुषोत्तम दास टंडन अध्यक्ष असताना वंदे मातरम म्हणण्यास सुरुवात केली. त्याच वर्षी पंडित नेहरू, मौलाना आझाद, सुभाषचंद्र बोस, रवींद्रनाथ टागोर आणि आचार्य नरेंद्र देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने वंदे मातरमला राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिली आणि भारताच्या विविधतेतील एकतेचे प्रतीक म्हणून त्याचा दर्जा निश्चित केल्याचेही खर्गे म्हणाले.