नवी दिल्ली : काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यांचा वापर पाकिस्तानात भारताची बदनामी करण्यासाठी केला जात आहे. मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांचे पक्षातील नेत्यांवर नियंत्रण नाही का? असा प्रश्न विचारत भाजपने काँग्रेसवर आगपाखड केली आहे. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या, महाराष्ट्रातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, रॉबर्ट वढेरा यांच्या वक्तव्याची उदाहरणे दिली.
भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना प्रसाद म्हणाले की, पहलगाममध्ये घडलेली दुर्दैवी घटना संपूर्ण देशाने पाहिली आणि संपूर्ण देशात याविषयी संताप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की दहशतवाद्यांवर कठोर कारवाई केली जाईल. मात्र काँग्रेसचे नेते बेताल वक्तव्य करत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात की, युद्ध होऊ नये तर कर्नाटकचे दुसरे नेते म्हणतात की दहशतवाद्यांनी लोकांना मारताना त्यांचा धर्म विचारला नाही.
महाराष्ट्र काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, सरकारने सांगितल्यानुसार दहशतवाद्यांनी लोकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या चालवल्या मात्र त्यांच्याकडे एवढा वेळ आहे का? काही लोकांच्या मतानुसार असे झाले नाही. मृतांचे कुटुंबीय रडून हे सत्य सांगत आहेत तेव्हा महाराष्ट्रातील नेते अशी विधाने करत आहेत जी असंवेदनशीलतेची परिसीमा आहे. रॉबर्ट वढेरा देखील त्यांची बुद्धिमत्तेचे दर्शन घडवत आहेत. देशात मुस्लिमांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असल्याने अशा घटना घडतात, असे ते म्हणतात. मणिशंकर अय्यरही काही तरी बोलतात, या लोकांनी ही बुद्धी कशी सुचते, असा प्रश्नही रविशंकर प्रसाद यांनी विचारला.
रविशंकर प्रसाद म्हणाले की, एकीकडे मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी सर्वपक्षीय बैठकीत सरकारसोबत असल्याचे सांगतात. ही प्रगल्भ राजकारणाची ओळख आहे मात्र काँग्रेसमध्येच इतर नेते काहीही बोलत आहेत. त्यांच्या सर्व विधानांचा गैरवापर पाकिस्तानात केला जात आहे. तिथल्या माध्यमांमध्ये एक मोहीम सुरू आहे. जेव्हा देशाने एका सुरात बोलायला हवे तेव्हा काँग्रेस नेते असे अनपेक्षित वक्तव्य करत आहेत. काँग्रेस नेतृत्व काय करत आहे. सिद्धरामय्या किंवा इतर नेत्यांना पक्षाने काही प्रश्न विचारले का, कोणाला जाहीरपणे माफी मागण्यास सांगितले आहे का? असे प्रश्न विचारत या सर्व वक्तव्याचा निषेधही रविशंकर प्रसाद यांनी केला.