विद्यार्थी  
Latest

नाशिक : आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता घसरली

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोना काळात सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला होता. विशेषत: शैक्षणिक क्षेत्रावर त्याचा दूरगामी परिणाम झाला आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यातून राज्यातील आदिवासी समाजातील विद्यार्थी सुटू शकले नाही. फेब्रुवारी-2023 मध्ये घेण्यात आलेल्या क्षमता चाचणीतून आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता घसरल्याची बाब समोर आली आहे. चाचणी परीक्षेचे मूल्यमापन फारसे समाधानकारक न लागल्याने आदिवासी विकास विभागाने आगामी शैक्षणिक वर्षापासून गुणवत्ता वाढीसाठी 'अ‍ॅक्शन प्लॅन' तयार केला आहे.

आदिवासी विकास विभागाने राज्यातील शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीच्या गणित व इंग्रजी विषयाची क्षमता चाचणी परीक्षा एकाच दिवशी अर्थात 17 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आली होती. त्यासाठी विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक आणि तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्या होत्या. क्षमता चाचणीच्या निकालानंतर कोरोनामुळे आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळल्याचे उघडकीस आले आहे. दहावीच्या दोन्ही विषयांची टक्केवारी 50 टक्क्यांपेक्षा खाली आली आहे. तर इतर इयत्तांचा निकालही निराशाजनकच असल्याचे चित्र आहे. आश्रमशाळास्तरावर झालेल्या क्षमता चाचणी परीक्षेच्या निकालानंतर मूल्यमापन फारसे समाधानकारक नसल्याचे निरीक्षण आदिवासी आयुक्तालयाकडून नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे सन 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून आश्रमशाळांतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शासनाकडून 'अ‍ॅक्शन प्लॅन' तयार करण्यात आला आहे. त्यानुसार आता शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमावर आधारित दोन क्षमता चाचणी घेण्यात येणार असून, मूल्यमापनानंतर आवश्यक सुधारणा करण्याची सूचना अपर आयुक्त व प्रकल्प अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत.

असा असणार 'अ‍ॅक्शन प्लॅन'
– वर्गशिक्षक अध्ययन क्षमतेनुसार विद्यार्थ्यांचे चार गटांत वर्गीकरण करणार
– गटनिहाय विद्यार्थ्यांसाठी अध्यापन पद्धतीचा वापर होणार
– अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांचे व्हिडिओ शाळांमध्ये प्रसारित करणार
– विद्यार्थ्यांना नियमित गृहपाठ दिला जाणार
– विशेष अध्यापनासाठी जादा तासिकेचे नियोजन
– दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची जानेवारीत सराव आणि पूर्वपरीक्षा होणार

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT