नेवासा फाट्यावर वाहतुकीची कोंडी | पुढारी

नेवासा फाट्यावर वाहतुकीची कोंडी

नेवासा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नेवासा फाटा या ठिकाणी रस्त्यावरच बस थांबा झाल्याने वाहतूक कोंडी होण्यास आणखी भर पडत आहे. नेवासा फाट्यावर बस थांबाच नसल्याने भर चौकातच बस थांबा झाल्याने सर्वच प्रवाशी हतबल झाले आहेत. अनेकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. नेवासा फाट्यावरील राजमुद्रा व आंबेडकर चौक आता एसटीचे बस थांबे बनल्याचे पाहायला मिळत आहे.

नेवासा फाटा येथील नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर राजमुद्रा चौक आणि आंबेडकर चौक या ठिकाणी भरचौकातच बस थांबत असल्यामुळे अनेक वेळा नगरहून संभाजीनगरकडे आणि संभाजीनगरहून पुण्याकडे जाणार्‍या-येणार्‍या वाहनांच्या रांगा एका मागोमाग एक लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे.

गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकल्यामुळे रस्ता आधीच अरुंद झाला आहे आणि त्यातच रस्त्यावरच भर चौकातच बस थांबा झाल्यामुळे असंख्य अपघात होऊन अनेक जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे प्रशासन आणखी किती जणांचा जीव जाण्याची वाट बघणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बर्‍याचवेळा वाहतुकीचे नियोजन नसल्यामुळे लग्नसराई तसेच लागोपाठ आलेल्या सुट्ट्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा होण्याचे प्रमाण वाढले आहे. वाहनाच्या लांबच लांब रांगा हे आता नित्याचीच बाब बनली आहे. वाहतूक पोलिस अधूनमधून दिसतात. त्यांचे जड वाहनांकडे अधिक लक्ष असल्याचे नागरिक सांगतात.

रस्त्याच्या दोन्ही बाजूला झालेले अतिक्रमण आणि रस्ता दुभाजकामुळे वाहतुकीची समस्या अतिशय जटिल झालेली आहे. नेवासा फाट्यावर वाहतूक कोंडीला व अपघातांना आळा बसण्यासाठी स्वतंत्र बस थांबा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

बेकायदा वाहतुकीला आवर घाला!
बेकायदा व परवाना धारक वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले पाहिजेत.

फाट्यावर उड्डाण पुलाची गरज!

नेवासा फाट्यावरून नगर-छत्रपती संभाजीनगर हा हायवे जातोय. वाहनांची वर्दळ सतत चालू असते. जडवाहनांचा भरणाही मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर आहे. तसेच कत्तलीसाठी जनावरांची वाहतूकही जोरात असते. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होऊन तासन् तास वाहतूक कोंडी होत असते. या भागात उड्डाण पुलाची गरज असल्याचे नागरिक सांगतात.

Back to top button