जालना : बनावट सोन्याची नाणी देऊन व्यापाऱ्याला ९ लाखांचा चूना | पुढारी

जालना : बनावट सोन्याची नाणी देऊन व्यापाऱ्याला ९ लाखांचा चूना

भोकरदन : पुढारी वृत्‍तसेवा भोकरदन शहरातील एका व्यापाऱ्याला सोन्याची बनावट नाणी देऊन एका भामट्याने नऊ लाख रुपयांना चुना लावल्याने शहरात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच ओळख झालेल्या व्यक्तीने व्यापाऱ्याला अलगद फसविल्याने हे एखादे मोठे रॅकेट असल्याचे बोलले जात आहे.

या घटनेविषयी माहिती अशी की, भोकरदन शहरातील लक्ष्मीनगर भागात राहणारे व्यापारी व शेतकरी गजानन रामकिसन सहाने यांची जालना येथे ७ मे रोजी एका व्यक्तीशी ओळख झाली होती. त्या व्यक्तीने त्यावेळी त्यांचा मोबाइल क्रमांक घेतला होता. त्या व्यक्तीने १० मे रोजी सहाने यांना फोन करून पाहुण्याला सोन्याची नाणी सापडली आहेत. ती विक्री करायची आहेत. तुम्ही खरेदी करता का, अशी विचारणा केली. सहाने यांनी पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर त्याने तुमच्या मध्यस्तीने नाण्यांची विक्री करून द्या, असे सांगितले.

त्यानंतर १६ मे रोजी त्या व्यक्तीने सोन्याची नाणी एकदा बघून तरी घ्या असे म्हणून पाहण्यासाठी सहाने यांना बोलावून घेतले. त्याने त्याच्याकडील एक ग्रॅमची दोन नाणी सहाने यांना दिली. सहाणे यांनी ती नाणी सोनाराकडे तपासल्यानंतर सोनाराने ती नाणी खरी असल्याचे सांगितले. दरम्यान सदरील व्यक्तीकडे असलेली सोन्याची नाणी खरी असल्याचा त्‍यांना विश्वास आला. त्यामुळे त्यांनी १७ मे राजी सहाने यांनी पैशांची जुळवाजुळव करून त्या व्यक्तीला फोन केला. त्या व्यक्तीने १८ मे रोजी त्यांना सिंदखेडराजा येथे बोलाविले.
सहाने व त्यांचा वाहन चालक हे दोघे १८ मे रोजी सिंदखेडराजा येथे गेले. त्या व्यक्तीसमवेत चर्चा झाल्यानंतर ते पुन्हा भोकरदन शहराकडे आले. नांजा पाटीवर त्या व्यक्तीने पिशवीतील नाणी सहाने यांच्याकडे देऊन नऊ लाख रुपये घेतले. घेतलेले पैसे पाहुण्याला देऊन येतो. नंतर सोनाराच्या दुकानात जाऊ, असे सांगत तो निघून गेला. दरम्यान ती व्यक्‍ती गेल्यानंतर त्याचा संपर्क होत नसल्‍याचे पाहून सहाने यांनी सोन्याच्या नाण्यांची तपासणी केली. त्यावेळी ती नाणी बनावट असल्याचे समोर आले. या प्रकरणात गजानन सहाने यांच्या तक्रारीवरून भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोठे रॅकेट असण्याची शक्यता 

भोकरदन शहरातील व्यापाऱ्याला बनावट सोने देऊन नऊ लाखाला चुना लावणाऱ्या त्या भामट्याच्या मागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी देखील अनेकांना सोन्याचे आमिष दाखवून फसवण्यात आले आहे. मात्र आता तब्बल नऊ लाखांना फसवण्यात आल्याने या प्रकरणाची जोरदार चर्चा होत आहे.

हेही वाचा :  

Back to top button