Drishyam : कोरियन भाषेत बनणार ‘दृश्यम’ हा पहिला भारतीय चित्रपट | पुढारी

Drishyam : कोरियन भाषेत बनणार 'दृश्यम' हा पहिला भारतीय चित्रपट

पुढारी ऑनलाईन डेस्क : मल्याळम ‘दृश्यम’ने ( Drishyam ) चाहत्यांच्या पसंतीस उतरत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. मल्याळम ‘दृश्यम’ चित्रपटात अभिनेता मोहनलाल यांनी भारदस्त भूमिका साकारून ठसा उमठविला. या चित्रपटाचे दिग्दर्शन जीतू जोसफ यांनी केलं होते. चित्रपटाच्या दमदार कामगिरीनंतर कन्नड, तेलुगू, तमिळ आणि हिंदी भाषेत रिलीज करण्यात आला. हिंदी भाषेतील ‘दृश्यम’ मध्ये बॉलिवूड अभिनेता अजय देवगन, श्रिया सरन आणि तब्बू यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या भारतीय भाषेनंतर आता ‘दृश्यम’ कोरियन भाषेत बनविणार असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय प्रोडक्शन बॅनर पनोरमा स्टूडियोज आणि दक्षिण कोरियाचे एंथोलॉजी स्टूडियोजने याबाबतची घोषणा केली आहे.

कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या इंडियन पॅव्हेलियनमध्ये ‘दृश्यम’ ( Drishyam ) कोरियन भाषेत बनविणार असल्याची माहिती समोर आली. यावेळी भारतीय पनोरमा स्टूडियोज आणि दक्षिण कोरियाचे एंथोलॉजी स्टूडियोजचे दोन्ही प्रमुख कुमार मंगत पाठक आणि जय चोई यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी झालेल्या मुलाखतीत ‘दृश्यम’ कोरियन भाषेत बनविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. कोरियन भाषेत बनविलेला हा पहिला भारतीय चित्रपट असणार आहे. ‘पॅरासाइट’ या ऑस्कर विजेत्या चित्रपटातील अभिनेता सॉन्ग कंग हो (Song Kang Ho) हे मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन किम जी वून (Kim Jee Woon) करणार आहेत.

यावेळी जय चोई म्हणाले की, ‘हिंदीमध्ये अनेक यशस्वी चित्रपटाचा रिमेक बनविण्यासाठी निर्माते उत्सुक असतात. मात्र, आम्ही ‘दृश्यम’ कोरियन भाषेत आणणार आहोत. भारत आणि कोरिया यांच्यात पहिल्यांदाच या चित्रपटाचा रिमेक बनणार असल्याने याला खूपच महत्त्व आले आहे. भागीदारीतून आम्ही भारतीय आणि कोरियन भाषेत सर्वोत्कृष्ट चित्रपट पूर्ण करूच’.

‘दृश्यम’ हा एक क्राईम थ्रिलरवर आधारित चित्रपट आहे. मल्याळम भाषेत ‘दृश्यम’ २०१३ रोजी आला होता. यानंतर दोन वर्षांनी २०१५ मध्ये तो हिंदीत आला. ‘दृश्यम २’ २०२१ मध्ये मल्याळममध्ये आणि २०२२ मध्ये हिंदीमध्ये रिलीज करण्यात आला. गेल्या वर्षातील टॉप हिट चित्रपटांपैकी एक हिंदीतील ‘दृश्यम’ चित्रपट ठरला. या चित्रपटाने भारदस्त कमाई केली होती.

हेही वाचा : 

Back to top button