श्रीगोंद्यात ऐतिहासिक बारव संवर्धन मोहीम | पुढारी

श्रीगोंद्यात ऐतिहासिक बारव संवर्धन मोहीम

श्रीगोंदा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र बारव मोहिम अंतर्गत श्रीगोंदा तालुक्यातील बाजारतळ जवळील पूर्व वेशीच्या समोरील पुरातन बारवेचे शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराच्या वतीने अध्यक्ष राजेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली संवर्धन कार्य सुरू करण्यात आले. श्रीगोंदा शहराला पुरातन, ऐतिहासिक, भौगोलिक, नैसर्गिक व सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. श्रीगोंदा तालुक्यांतील बारवांची महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख आहे. बारवांनी श्रीगोंदा तालुक्यातील पुरातन वैभव जपले आहे.

सर्व बारवांनी पुरातन काळापासून एक सर्वगुण संपन्न, व प्राचिन राजमार्गावरील तालुका म्हणून ओळख दिली आहे. ह्या देदीप्यमान इतिहासाचे -बारवांचे संवर्धन करण्याची जबाबदारी व कर्तव्य शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराने स्वीकारले आहे. वर्षानुवर्षे दुर्लक्षित वारसा जतन व्हावा म्हणून ही बारव जतन मोहिम राबविण्यात आली. हे कार्य अजून काही महिने सुरू राहील, असे शिवदुर्गचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी सांगितले.

रविवारी सकाळी सात ते साडेनऊ वाजेपर्यंत बारव स्वच्छता व संवर्धन मोहीम राबविण्यात आली. याकामी शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराच्या 18 सदस्यांनी मोठी कामगिरी पार पाडली. स्वच्छता मोहिमेला आवश्यक साहित्याची व बारवेची विधिवत पूजा करून या ऐतिहासिक कामाची सुरूवात झाली. वर्षानुवर्षे दुर्लक्षित असल्याने संपूर्ण बारवेवरती झाडे झुडपे वाढल्याने बारव दिसून येत नव्हती.

नागरिकांनी कचरा टाकल्याने संपूर्ण पायरी मार्ग बंद झाला होता. बारव बुजली आहे. प्रथम पायरी मार्गावरील कचर्‍याची विल्हेवाट लावली. त्यानंतर झुडपे काढून टाकण्यात आली. त्यामुळे बारवेचा आकार दिसू लागला आहे. उर्वरित काम पुढील आठवड्यात करण्यात येइल.
याकामी बारवेच्या आसपास राहणार्‍या नागरिकांनी , नगरपालिका प्रशासनाने सहकार्य केले. तसेच श्रीगोंदा शिवसेना शहरप्रमुख नंदकुमार ताडे यांनी शिवदुर्ग स्वयंसेवकांना अल्पोपहार देऊन सहकार्य केले.

या स्वच्छता मोहिमेत दिगंबर भुजबळ, नवनाथ खामकर मेजर, रहिम हवालदार, गणेश कुदळे मेजर, रमेश हिंगणे मेजर, अक्षय ओहळ, हेमंत काकडे, प्रणव गलांडे, अमोल बडे, अतुल क्षीरसागर, वरद शिंदे, मच्छिंद्र लोखंडे, मिठू लंके, सागर शिंदे, ईश्वर कोठारे, संगीता इंगळे, विजया लंके यांनी सहभाग नोंदवला.

Back to top button