नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देशविघातक कारवाया आणि समाजात अशांतता निर्माण करण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या 'पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया' (पीएफआय) या संघटनेच्या सदस्यांचा मोबाइल फॉरमॅट करून देणाऱ्या संशयितास नाशिकच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी (दि.२१) रात्री अटक केली आहे. उन्नैस उमर खय्याम पटेल (३१, रा. जळगाव) असे या संशयिताचे नाव आहे. त्यास न्यायालयाने ४ नोव्हेंबरपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) नेतृत्वाखाली राज्यात दहशतवादविरोधी पथकाच्या नाशिक पथकाने २२ सप्टेंबर रोजी छापासत्र राबवून राज्यभरातून पाच संशयितांना अटक केली आहे. या सदस्यांना २६ दिवस एटीएस कोठडी सुनावल्यानंतर त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. दरम्यान, अटकेत असलेल्या संशयितांनी खबरदारी म्हणून त्यांचा मोबाइल फॉरमॅट करून त्यातील सर्व संवेदनशील माहिती पुसून टाकल्याचे एटीएसच्या लक्षात आले होते.
तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. त्यात २०४७ पर्यंत भारत मुस्लिम राष्ट्र बनवणे, राम मंदिराच्या जागी बाबरी उभारणे असे हेतूही या संघटनेचे असल्याचे समजले. त्यामुळे या प्रकरणातील संवेदनशिलता वाढली. दरम्यान, संशयितांनी उन्नैस पटेल याची मदत घेऊन त्यांचे मोबाइल फॉरमॅट केल्याचे तपासात समोर आले. याआधी अटक केलेल्या संशयितांपैकी उन्नैसचा वसीम शेख याच्यासोबत संपर्क आला होता. त्याच्या मार्फत उन्नैस कय्युम शेखचा मोबाईल फॉरमॅट करून दिल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले. त्याचप्रमाणे या संशयितांचा क्रिएटीव्ह माईड्स ग्रुप नावाचा व्हॉट्सअप ग्रुपही असल्याचे समोर आले. उन्नैसच्या मोबाइलमध्ये दोन ऑडीओ क्लीप आढळून आल्या असून त्यातील संभाषण आक्षेपार्ह असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे एटीएसच्या पथकाने उन्नैस पटेल याची सुरुवातीस चौकशी करीत पुरावे आढळल्यानंतर त्यास शुक्रवारी (दि.२१) अटक केली. त्याला शनिवारी (दि.२२) न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तीवाद करीत १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली. त्यात संशयित उन्नैस याने संशयितांचा मोबाइल फाॅरमॅट कसा केला, त्यात कोणता डाटा होता, ही माहिती गोळा करण्यासाठी कोठडीची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यानुसार न्यायालयाने उणेस पटेल यास चार नोव्हेंबर पर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे.
नाशिकच्या एटीएस पथकाने मालेगावातून संशयित मौलाना सैफुर्रहमान सईद अन्सारी (२६, रा. हुडको कॉलनी, मालेगाव), पुण्यातून अब्दुल कय्युम बादुल्ला शेख (४८), रझी अहमद खान (३१, रा. दोन्ही रा. कोंढवा, पुणे), वसीम अझीम उर्फ मुन्ना शेख (२९, रा. अजीजपुरा, बीड), मौला नसीसाब मुल्ला (रा. सुभाषनगर, कोल्हापूर) या पाच सदस्यांना अटक केली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.