नगर तालुक्यात अतिवृष्टीने 97 गावे बाधित ; शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान | पुढारी

नगर तालुक्यात अतिवृष्टीने 97 गावे बाधित ; शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान

शशिकांत पवार :  नगर तालुका : तालुक्यात चित्रा नक्षत्रात सततच्या पावसाने शेतकर्‍यांच्या कांदा, सोयाबीन व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जेऊर पट्ट्यात ढगफुटी सदृश पावसाने दररोज सीना, खारोळी नदीला पूर येत आहे. खोसपुरी, पांगरमल, उदरमल, सोकेवाडी, मजले चिंचोली या भागात गुरुवार व शुक्रवारी सलग दोन दिवस ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने परिस्थिती फारच बिकट बनली आहे. तालुक्यातील सर्वच तलाव, बंधारे तुडुंब भरले आहेत. नद्या, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. सारोळा कासार येथील पूर्वा नदी, अकोळनेर येथील वालुंबा नदी, चिचोंडी पाटील येथील केळ नदी ओसंडून वाहत आहेत.

सततच्या पावसाने कांदा, सोयाबीन व कांद्याच्या रोपांची पार वाताहत झाली आहे. नुकसानीमुळे कांदा उत्पादनात घट होणार आहे. बाजरी, मका, भाजीपाला, नवीन पेरलेली ज्वारी, नव्याने लागवड केलेल्या फळबागा यांचेही नुकसान झाले आहे. ज्वारीच्या दुबार पेरणीचे संकट आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. तालुक्यात सरासरी 138 टक्के पाऊस झाला असून सरसकट अनुदान देण्याची मागणी होत आहे.

मंडलनिहाय झालेला पाऊस (टक्के)
नालेगाव 135, सावेडी 164, कापूरवाडी 120, केडगाव 161, भिंगार 141, नागापूर 178, जेऊर 147, चिचोंडी पाटील 122, वाळकी 108, चास 114, रुईछत्तीसी 133, संपूर्ण नगर तालुका सरासरी 138 टक्के.

आदिवासींची पुनर्वसनाची मागणी
पिंपळगाव तलावातील आदिवासी समाजाच्या पालांनी पावसामुळे पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे येथील नागरिक जीव मुठीत धरून जीवन जगत आहेत. नद्यांच्या पुरातून आलेल्या विषारी सापांचे वास्तव्य पालाशेजारीच असून, येथील चिमुरड्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. येथील आदिवासी समाजाचे पुनर्वसन करण्याची मागणी होेत आहे. आता प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहणार, याकडेही जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

 

नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात येत आहेत. कोणीही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहू नये, याची दक्षता घेण्यात येत आहे. तालुक्यात नद्या, ओढे दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी.
                                                – उमेश पाटील, तहसीलदार, नगर तालुका

तालुक्यातील 119 गावांपैकी 97 गावे पावसाने बाधित झाले आहेत. महसूल, कृषी व ग्रामपंचायतींकडून संयुक्तपणे पंचनामे करण्यात येत आहेत. पंचनामे पूर्ण होण्यासाठी आठ ते दहा दिवस लागणार आहेत.
                                      पोपटराव नवले, कृषी अधिकारी, नगर तालुका

Back to top button