Hydrabad Incident : बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळले नवविवाहित डॉक्टर जोडपे, गिझरचा शॉक लागून मृत्यूची शक्यता | पुढारी

Hydrabad Incident : बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळले नवविवाहित डॉक्टर जोडपे, गिझरचा शॉक लागून मृत्यूची शक्यता

पुढारी ऑनलाइन डेस्क : Hydrabad Incident : हैदराबादमध्ये एक नवविवाहित डॉक्टर जोडपे त्यांच्याच घरातील बाथमरूममध्ये मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गुरुवारी सायंकाळी घटना उघडकीस आली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात बाथरुमच्या गिझरला वायर जोडल्याने विजेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

डॉक्टर सय्यद निसारुद्दीन (वय 26), पत्नी सायमा निसारुद्दीन अशी मृतांची नावे आहेत. दोघांचेही काही महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. खादरबाग परिसरात त्यांचे घर होते.

Hydrabad Incident : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवविवाहित जोडपे त्यांच्या खादरबाग परिसरातील घरी राहत होते. डॉक्टर सय्यद निसारुद्दीन हे सूर्यापेट येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात काम करत होते. तर सायमा ही मेडिकल कॉलेजच्या अंतिम वर्षात होती.

सायमाचे वडील उम्मे मोहिमीन यांनी सांगितले की, बुधवारी रात्री सूर्यपेटहून परतल्यानंतर गुरुवारी सकाळी तिचे सायमाचे बोलणे झाले. त्यावेळी तिने नंतर फोन करते असे सांगितले. मात्र नंतर फोन आलाच नाही. कदाचित दोघेही कामावर गेले असावेत असा मोहिमीन यांनी अंदाज लावला. नंतर त्यांनी सायंकाळी पुन्हा कॉल केले. मात्र, दोघांपैकी कोणीही कॉलचे उत्तर देत नव्हते. त्यामुळे नेमके काय झाले म्हणून त्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली.

Hydrabad Incident : मोहिमीन म्हणाले, ” “जेव्हा आम्ही घरात गेलो, तेव्हा काहीतरी गडबड झाली असावी असा संशय घेऊन आम्ही वीज पुरवठा बंद केला आणि नंतर खिडकीतून आत प्रवेश केला आणि जोडपे मृत दिसले.”

तपास अधिकारी उपनिरीक्षक एस श्रुती यांनी सांगितले, “काल सकाळी हा प्रकार घडला असावा. पण संध्याकाळी उशिरापर्यंत कोणीही तपासले नाही. रात्री साडेअकरा वाजता आम्हाला कळवल्यानंतर आम्ही आत गेलो तेव्हा आम्हाला ते मृतावस्थेत आढळले. पती पत्नीला वाचवण्यासाठी गेल्याचे दिसून येत आहे. पण दोघांचाही मृत्यू झाला.”

दरम्यान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्यांना शवविच्छेदनासाठी उस्मानिया जनरल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

हे ही वाचा :

Hydrabad Police Action : 903 कोटींच्या चिनी गुंतवणुकीच्या फसवणुकीचा पर्दाफाश, 10 जणांना अटक

शास्त्रज्ञांनी विकसित केली डासांपासून बचाव करणारी अंगठी; जाणून घ्या काय खास आहे त्यात

Back to top button