१०० वर्षाची बेरोजगारीची समस्या १०० दिवसांत सुटू शकत नाही : पंतप्रधान मोदी | पुढारी

१०० वर्षाची बेरोजगारीची समस्या १०० दिवसांत सुटू शकत नाही : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : “बेरोजगारीची समस्या १०० वर्षांची असून ती १०० दिवसांत सुटू शकत नाही”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.२२) रोजगार मेळाव्याच्या उद्गघाटनप्रसंगी बोलताना म्हटले आहे. रोजगार मेळावा हा गेल्या ८ वर्षातील रोजगार, स्वयंरोजगारासाठी सरकारच्या प्रयत्नांमधील एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. पीएम मोदी पुढे म्हणाले की, सरकार उत्पादन, पर्यटन विस्तार करण्यावर भर देत आहे कारण ही क्षेत्रे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करतात.

कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमांबद्दल पंतप्रधान मोदी यांनी भाष्य केले. कोविड महामारीच्या काळात एमएसएमई क्षेत्राला केंद्राने ३ लाख कोटींहून अधिक मदत दिली. यामुळे १.५ कोटींहून अधिक नोकऱ्यांवरील संकट टळल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रोजगार मेळाव्याचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमादरम्यान ऐन दिवाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ७५ हजार युवकांना नोकरीचे ‘गिफ्ट’ दिले. व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांनी देशभरातील युवकांना संबोधित केले. आज केंद्र सरकार देशातील ७५ हजार युवकांना नोकरीचे नियुक्तीपत्रे देत आहे. गेल्या ८ वर्षांतदेखील लाखो युवकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. पुढील काही महिन्यांत याचप्रमाणे लाखो युवकांना सरकारकडून वेळोवेळी नियुक्तीपत्रे दिली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आज भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. ७-८ वर्षाच्या आत आम्ही १० व्या क्रमांकावरुन ५ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ८ वर्षांत देशातील अर्थव्यवस्थतेसंदर्भातील ज्या काही अडचणी येत्या त्या आम्ही सोडवल्या आहेत. यामुळे भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

यावेळी पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा दिल्या. भगवान धन्वंतरी तुम्हा सगळ्यांना खूश ठेवो आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो, असे मोदी म्हणाले.

या कार्यक्रमात देशातील वेगवेगळ्या शहरांमधून केंद्रीय मंत्री, खासदार सहभागी झाले होते. दरम्यान, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी चंदीगड येथील रोजगार मेळावा कार्यक्रमात बेरोजगारांना नियुक्तीपत्रे दिली. जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व केंद्रीय विभाग तसेच केंद्रीय मंत्रालयांसोबत आढावा घेत दीड वर्षांमध्ये अर्थात डिसेंबर २०२३ पर्यंत १० लाख युवकांना नोकरी देणार असल्याचे जाहीर केले होते. पंतप्रधानांच्या घोषणेनंतर या दिशेने वेगाने काम सुरू करण्यात आले होते.

देशभरातून निवडले गेलेले नवनियुक्त कर्मचारी, केंद्र सरकारच्या ३८ मंत्रालये, विभागांमध्ये कामावर रुजू होतील. यात अ श्रेणी, ब श्रेणी (राजपत्रित अधिकारी) तसेच ब श्रेणी( अ-राजपत्रित) आणि क श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या भरतीयोग्य पदांमध्ये, केंद्रीय सशस्त्र दलाचे कर्मचारी,उपनिरीक्षक, हवालदार, स्टेनो, स्वीय सचिव, प्राप्तिकर निरीक्षक, एमटीएस (शिपाई) अशा पदांचा समावेश आहे, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

मंत्रालये आणि विभागांद्वारे, स्वतः ही भरतीप्रक्रिया मिशन मोडवर पूर्ण केली जात आहे, अथवा, केंद्रीय लोकसेवा आयोग, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे भरती मंडळ अशा संस्थांच्या माध्यमातून ही प्रक्रिया होत आहे. भरती प्रक्रिया जलद गतीने व्हावी, यासाठी ती सुलभ आणि तंत्रज्ञानयुक्त करण्यात आल्याचे देखील पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा :

Back to top button