जळगाव; पुढारी वृत्तसेवा : गेल्या दीड वर्षांपासून जिल्हयात तसेच राज्यात कोरोनामुळे सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणूका लांबणीवर पडल्या होत्या. त्यात जिल्हा बँकेसह १११८ सहकारी संस्थाचा समावेश आहे. यात पहिल्या टप्प्यात जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रिया मार्गी लागली आहे. २५ सप्टेबर रोजी अंतीम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. (Nashik District Bank)
दरम्यान जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे सिमोल्लंघन लवकरच होणार असल्याची चिन्हे असली तरी सर्वपक्षीयांची होणारी बैठक निवडणूक तोंडावर आली तरी थंडबस्त्यात आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वच पक्ष आपआपली ताकद अजमावत स्वबळावर लढण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
विद्यमान जिल्हा बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्षांसह अन्य संचालकांना पुन्हा संधी मिळते की नवा भिडू नवा राज असा खेळ रंगतो याची जिल्ह्यात ज्येष्ठ, श्रेष्ठ राजकीय धुरिणांसह सर्वांनाच उत्कंठा आहे.
राज्यात सर्वच जिल्ह्यात असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँका शेतकर्यांना स्थानिक विकास सोसायट्यामार्फत पीककर्ज पुरवठा करतात. त्यामुळे जिल्हा बँक खर्या अर्थाने सर्वसामान्यांची बँक आहे. गेल्या दोन तीन पंचवार्षिकमध्ये जिल्हा बँक तोट्यात होती.
परंतु २०१५ नंतर कडक शिस्तीचे व्यवस्थापन नियमांची अंमलबजावणीसह शेतकर्यांना देखील पीककर्ज पुरवठा निम्मेवर आणल्यामुळे तोटयातून बाहेर आली.
नाशिक जिल्हा बँकेत माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सर्वपक्षीय आघाडी करत भाजप आघाडीची एकहाती सत्ता मिळवली. परंतु २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकांनंतर सत्तेवर महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जिल्हा बँकेतही सत्ताबदलाचे संकेत दिसून आले आहेत.
जिल्हा बँकेच्या विद्यमान अध्यक्षा ऍड. रोहीणी खडसे-खेवलकर यांना पुन्हा अध्यक्षपदाची संधी मिळते किंवा काय, तसेच त्यांच्यासह अन्य संचालकांना पुन्हा संधी मिळते याचे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले दिसून येत आहे.
आतापर्यंत जिल्हा बँकेची निवडणूक सर्वपक्षीय बैठकीतून बिनविरोध संचालक निवडून येण्याची परंपरा होती. परंतु यावर्षी सर्वपक्षीय बैठक थंडबस्त्यात असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणूकीसाठी ८५३ विकासो, १५१७ अन्य संस्थांसह ४८३ व्यक्तीगत सभासदांचे मतदानात सहभाग असून या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय-आठवले गट, जागृत जनमंच यासह अनेक गट आपआपले नशीब स्वबळावर अजमावण्याची शक्यता आहे.