Latest

Nashik Crime : विम्याच्या रकमेसाठी एकाला दारू पाजून कारखाली चिरडले, दोन वर्षांनी उलगडा

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कोट्यवधी रुपयांचा विमा काढून स्वत:च्या जागी दुसऱ्याचा मृतदेह दाखवून विम्याची रक्कम हडपण्यासाठी सहा जणांच्या टोळीने जानेवारी २०२१ मध्ये एका व्यक्तीस दारू पाजून कारखाली चिरडत खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच टोळीने कट रचून विमाधारक सहकाऱ्याचाच सप्टेंबर २०२१ मध्ये खून करून विम्याची रक्कम हडप केल्याचे काही दिवसांपूर्वी उघडकीस आले होते. या प्रकरणीही मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे विम्याच्या रकमेसाठी या टोळीने २०२१ मध्ये दोन खून केल्याचे उघडकीस आले आहे.

म्हसरूळ पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.२८) मुंबईनाका पोलिस ठाण्यातील अधिकारी चेतन श्रीवत यांनी खुनाची फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, संशयित मंगेश बाबूराव सावकार (३०, रा. सम्राटनगर, दिंडोरी रोड), रजनी कृष्णदत्त उके (३९, रा. श्रीरामनगर, पंचवटी), दीपक अशोक भारुडकर (३१, रा. नंदिनीनगर), प्रणव राजेंद्र साळवी (२२, रा. बुधवार पेठ), योगेश साळवी व अशोक सुरेश भालेराव (४६, रा. देवळाली कॅम्प) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल असून, त्यापैकी अशोक भालेराव याचा मृत्यू झाला आहे. चेतन श्रीवत यांच्या फिर्यादीनुसार, सहा संशयितांनी कट रचून एका मद्यपीस २६ जानेवारी २०२१ ला रात्री अकरापासून पंचवटी परिसरात दारू पाजली. २७ जानेवारी २०२१ च्या पहाटे चारपर्यंत मद्यपीस दारू पाजल्यानंतर संशयितांनी त्यास लाल रंगाच्या स्कॉर्पिओ कारमध्ये बसवून आडगाव-म्हसरूळ लिंक रोडवरील जगन्नाथ लॉन्सजवळील रस्त्यावर झोपवले. त्यानंतर संशयितांनी त्याच्या अंगावरून कार चालवून त्याचा खून केला. या प्रकरणी जानेवारी २०२१ मध्ये म्हसरूळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद होती. दरम्यान, संशयितांनी अशोक भालेराव याच्या नावे कोट्यवधी रुपयांचा विमा काढला होता. अशोकच्या ऐवजी दुसऱ्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला असल्याचे भासवून मृत व्यक्ती अशोक भालेराव आहे, असा कट संशयितांचा होता. मृत व्यक्ती हीच अशोक भालेराव असल्याचे संशयितांनी दाखवल्यास त्यांना विम्याच्या रकमेपोटी चार कोटींहून अधिक रक्कम मिळणार होती. त्यासाठी संशयितांनी मृत व्यक्तीवर पाळत ठेवून त्यास दारू पाजून ठार मारल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.

संशयितांनी सहकाऱ्याचाच खून केला

मद्यपीचा खून केल्यानंतर संशयितांनी भीतीपोटी मृतदेहावर दावा केला नाही. त्यामुळे त्यांचा बेत फसला होता. त्यानंतर अशोक भालेरावला अंधारात ठेवून इतर पाच संशयितांनी दुसरा कट रचून विमाधारक अशोकचाच २ सप्टेंबर २०२१ मध्ये इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ खून करून अपघाती मृत्यू असल्याचे भासवले. अशोक भालेरावची पत्नी म्हणून संशयित रजनी उके हिचे बनावट कागदपत्रे तयार करून अशोकच्या विम्याचे कोट्यवधी रुपये पाच संशयितांनी बळकावले होते. मात्र, संशयितांमध्ये पैसे वाटपावरून वाद झाल्याने एका संशयिताने अशोकच्या नातलगास खुनाची माहिती दिली. त्यामुळे संशयितांचे डिसेंबर २०२२ मध्ये बिंग फुटले. अशोकच्या खुनाच्या गुन्ह्याचा तपास करतानाच म्हसरूळ येथील खुनाचा उलगडा झाला आहे.

मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न

म्हसरूळच्या हद्दीत संशयितांनी ज्या व्यक्तीचा खून केला आहे त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. सुरुवातीस मालवाहू वाहनाच्या टपावरून किंवा फाळक्यावरून खाली पडल्याने संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद म्हसरूळ पोलिस ठाण्यात होती. त्यावेळीही मृत व्यक्तीची ओळख पटलेली नव्हती. तर संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती गुजराती भाषा बोलत होती. त्यामुळे पोलिसांनी आता मृताची ओळख पटवण्यास पुन्हा सुरुवात केली आहे.

संशयितांनी म्हसरूळ येथे एकाचा कारखाली चिरडून खून केल्यानंतर मृतदेहावर अशोकच्या नावे दावा करण्याचा बेत आखला. मात्र, मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी जिल्हा रुग्णालयात मृताचे आधारकार्ड किंवा इतर ओळखपत्र देण्यासह नातलगांचेही कागदपत्रे जमा करणे आवश्यक असते. त्यामुळे संशयितांनी भीतीपोटी ही कागदपत्रेही रुग्णालयात जमा केली नाही किंवा मृतदेह अशोक भालेरावचा आहे, असा दावाही केला नसल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. अखेर संशयितांनी अशोकला अंधारात ठेवून त्याचाच खून करून विम्याचे पैसे घेतल्याचे उघडकीस आले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT