उरुळीत सरपंच, सदस्य मुरमाची चोरी करीत असल्याची तक्रार; आरोप सरपंचांनी धुडकाविले | पुढारी

उरुळीत सरपंच, सदस्य मुरमाची चोरी करीत असल्याची तक्रार; आरोप सरपंचांनी धुडकाविले

उरुळी कांचन; पुढारी वृत्तसेवा : उरुळी कांचन ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत मंजूर झालेल्या 89 कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेच्या स्टोअरेज टँक उत्खननात मोठ्या प्रमाणात मुरमाचा उपसा होत आहे. या मुरमाची ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी सदस्यांच्या संगनमताने परस्पर विल्हेवाट लावून शासनाच्या कोट्यवधींच्या गौणखनिज उत्पन्नावर डल्ला मारल्याची तक्रार भाजपचे उरुळी कांचन शहराध्यक्ष अमित कांचन यांनी हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांच्याकडे केली आहे.

उरुळी कांचन ग्रामपंचायतीची अनेक वर्षे रखडलेली विस्तारित पाणीपुरवठा योजना मार्गी लागावी, यासाठी उरुळी कांचन (ता. हवेली) येथील श्री राम देवस्थान समितीच्या मालकीची सीताई इनाम जमिनीची 7 एकर जागा 99 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर योजनेसाठी देऊ केली आहे. गट 129/1 मधील या जागेत ग्रामपंचायतीने खासगी ठेकेदारामार्फत सुरू केलेल्या स्टोअरेज टँक कामाच्या उत्खननात ग्रामपंचायतीने सरपंच व सदस्यांच्या संगनमताने हा उत्खनन झालेला मुरूम परस्पर विल्हेवाट लावला आहे.

या उत्खननात महसूल प्रशासनास पूर्वकल्पना न देता चोरीच्या उद्देशाने रोज रात्री रासरोसपणे मुरूम विकला जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या मुरमाचे उत्खनन करताना खौणखनिजे कायद्यातून हे उत्पन्न महसूल विभागाचे असताना पूर्वकल्पना न देता ग्रामपंचायतीच्या देखभाल नावाखाली सरपंच व सदस्य मिळून लुटत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या संपूर्ण गौणखनिजाच्या विक्रीची तपासणी करून सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर कारवाई करून दंडात्मक वसुली करावी, अशी मागणी तक्रारीत शहराध्यक्ष अमित कांचन यांनी तहसीलदार किरण सुरवसे यांच्याकडे केली आहे.

विकासकामात अडवणूक करणार्‍यांनी केली तक्रार : सरपंच राजेंद्र कांचन
यासंदर्भात सरपंच राजेंद्र कांचन यांना विचारले असता ते म्हणाले की, उत्खननाने शासनाचा कोणताही महसूल बुडण्याचा प्रश्न येत नसून शासनाने टेंडर प्रक्रियेत उत्खननाची रक्कम भरून घेतली आहे. झालेले मुरूम उत्खनन हे मुरमाची सोय लावावी म्हणून कोरेगावमूळ, उरुळी कांचन, शिंदवणे या पर्यायी जागेत ठेवला आहे. त्यामुळे झालेल्या उत्खनानाची चोरी म्हणणे चुकीचे आहे. ज्या कुटुंबीयांनी ड्रेनेजलाइन व रस्ता यांसारखी कामे अडवणूक करून नागरिकांची गैरसोय केली, ते काम करू देत नाही, म्हणून अशी तक्रार केली आहे.

Back to top button