वडगावातील ‘ई-लर्निंग’ची घंटा वाजली! इंग्रजी माध्यमाची शाळा अखेर सुरू | पुढारी

वडगावातील ‘ई-लर्निंग’ची घंटा वाजली! इंग्रजी माध्यमाची शाळा अखेर सुरू

धायरी; पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव येथील शरदचंद्रजी पवार अकॅडमी ऑफ ई-लर्निंग स्कूलच्या इमारतीचे काम एक वर्षापूर्वी पूर्ण झाले होते. मात्र, या इमारतीत शाळा भरत नव्हती. याबाबत दैनिक ‘पुढारी’ने नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत महापालिका शिक्षण मंडळाने या इमारतीत अखेर ई-लर्निंग शाळा सुरू केली आहे. यामुळे विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. वडगाव येथे ई-लर्निंग स्कूलसाठी ही इमारत उभारण्यात आली आहे.

सुमारे एक वर्षापूर्वी या इमारतीचे काम पूर्ण होऊनदेखील या ठिकाणी शाळा सुरू करण्यात आली नव्हती. सतत विविध कारणांने या इमारतीत शाळा सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून टाळाटाळ होत होती. याबाबत दैनिक ‘पुढारी’ने ‘ई-लर्निंग शाळेची घंटा वाजणार कधी ?’या शीषर्काखाली नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले होते. शिक्षण मंडळाने त्याची दखल घेत अखेर या इमारतीत इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थी, पालक व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या शाळेच्या नवीन इमारतीत शाळा सुरू करण्याऐवजी प्रशासनाने महापालिकेचा छपाई कारखाना तळमजल्यावर सुरू केला होता. यामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करून आंदोलनाचा इशारा दिला होता. या इमारतीत ई-लर्निंग शाळा लवकर सुरू करण्याची मागणी माजी नगरसेवक श्रीकांत जगताप यांनी केली होती, तसेच येणार्‍या शैक्षणिक वर्षात या इमारतीत ई-लर्निंग स्कूल सुरू करण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे युवा सेनेचे शहरप्रमुख नीलेश गिरमे यांनी दिला होता.

इमारतीसाठी सात कोटींचा खर्च
सिंहगड रोडलगत महापालिकेच्या वतीने टेलिफोन एक्स्चेंजजवळ ही शाळा सुरू करण्यात आली आहे. या इमारतीसाठी 6 कोटी 80 लाख 13 हजार रुपयांचा खर्च करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध आधुनिक सोयीसुविधा आहेत. पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व वर्ग खोल्यांत पंखे बसविण्यात आले आहे. मुलांना खेळण्यासाठी भव्य मैदानही तयार करण्यात आले आहे. या शाळेची पहिली घंटा आता वाजल्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

सिंहगड रोड व वडगाव परिसरातील विद्यार्थ्यांसाठी या शाळेच्या माध्यमातून आधुनिक सुविधांयुक्त सुसज्य इमारत मिळाली आहे. त्यांना खेळण्यासाठी उत्तम मैदानदेखील तयार करण्यात आले आहे.
                                             -विजय आवारी, साहाय्यक शिक्षणप्रमुख.

Back to top button