दै. पुढारी कस्तुरी क्लब अप्सरा आली लावणीचा बहारदार कार्यक्रम : ठसकेबाज लावण्यांवर कस्तुरींनी धरला ठेका | पुढारी

दै. पुढारी कस्तुरी क्लब अप्सरा आली लावणीचा बहारदार कार्यक्रम : ठसकेबाज लावण्यांवर कस्तुरींनी धरला ठेका

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘या रावजी तुम्ही बसा भावजी…’, ‘मला म्हणत्यात पुण्याची मैना…’, ‘सोळावं वरीस धोक्याचं…’, ‘अप्सरा आली…’, ‘आता वाजले की बारा’, ‘खेळताना रंग बाई होळीचा…’ अशा वैविध्यपूर्ण ठसकेबाज लावण्या लावणीसम्राज्ञी मंजू वाघमारे व सहकलाकारांनी सादर केल्या. त्यांच्या या सादरीकरणाला उपस्थित महिलांची उत्स्फूर्त दाद मिळाली. खचाखच भरलेल्या सभागृहात महिलांनीही गाण्यावर ठेका धरला अन् मनसोक्तपणे नाचण्याचा आनंद लुटला. कलाकारांच्या सादरीकरणाला महिला प्रेक्षकांनी शिट्ट्या अन् टाळ्यांनी दाद देत सभागृह दणाणून सोडले. कलाकारांनीही आपल्या अदांनी अन् बहारदार लावण्या सादर करीत मने जिंकली.

निमित्त होते ‘पुढारी कस्तुरी क्लब’तर्फे आयोजित फक्त महिलांसाठी ‘अप्सरा आली’ कार्यक्रमाचे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात रंगलेल्या कार्यक्रमात मंजू वाघमारे यांच्यासमवेत रीलस्टार काजल हंचाटे (स्वीटी), लावणीसम्राज्ञी कालिंदी ठोंबरे, शीतल चोपडे, पूनम कोकाटे, रूपाली सूर्यवंशी आणि पूनम बागवे यांनी सादरीकरण केले; तर बहारदार निवेदनाने मेघना झुझम यांनी कार्यक्रमात रंगत आणली. हा लावण्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी सभागृहात कस्तुरी सदस्यांनी तुडुंब गर्दी केली. त्यांनी पारंपरिक वेशभूषेत कलाकारांसोबत नाचण्याचा आनंद लुटला. कलाकारांच्या प्रत्येक लावणीला महिला प्रेक्षकांनी वन्स मोअर दिला अन् टाळ्यांचा कडकडाट केला.

‘जात होते उसाच्या मळ्यात गं…’ या लावणीने मंजू वाघमारे यांनी कार्यक्रमाची दमदार सुरुवात केली. त्यानंतर संपूर्ण ग्रुपने सादर केलेल्या ‘खेळताना रंग बाई होळीचा’ या लावणीलाही दाद मिळाली. कालिंदी यांच्या ‘या रावजी तुम्ही बसा भावजी’ या लावणी सादरीकरणावर शिट्ट्या अन् टाळ्यांचा कडकडाट झाला, तर काजल हंचाटे यांनी ‘इशकाचा बान सुटला’ ही लावणी सादर करीत कस्तुरी सदस्यांना लावणीवर ठेका धरायला लावले. शीतल चोपडे यांच्या ‘अप्सरा आली’ या लावणीने मने जिंकली, तर पूनम बागवे यांनी सादर केलेल्या ‘फॅन्टॅस्टिक म्हणतोय मला’ने वन्स मोअर मिळवला.

कलाकारांच्या दमदार सादरीकरणाने हा कार्यक्रम खास ठरला. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक मुंबई ऑन्कोकेअर सेंटर-पुणे, ज्वेलरी पार्टनर लीनाज् 1 ग्रॅम ज्वेलरी, ऑनलाइन एज्युकेशन पार्टनर कॅशनेटर आणि गिफ्ट पार्टनर अ‍ॅस्ट्रोहब हे होते.कार्यक्रमाला मुंबई ऑन्कोकेअर सेंटर- पुणेचे विजय मोरे, अ‍ॅस्ट्रोहबचे डॉ. रवींद्र बर्वे, लीनाज् 1 ग्रॅम ज्वेलरीच्या लीना मुंडलिक, कॅशनेटरचे वैभव पाटसकर आणि क्रांती खांडरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

हे ठरले कार्यक्रमातील आकर्षण…
या कार्यक्रमाला आलेल्या प्रेक्षकांमधून पाच लकी विजेत्यांना ’अ‍ॅस्ट्रोहब’कडून आकर्षक एक ग्रॅम सोन्याची नथ देण्यात आली.
कॅशनेटरकडून उपस्थित राहणार्‍या प्रेक्षकांमधील 15 भाग्यवान लकी ड्रॉ विजेत्यांना पाचशे रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर देण्यात आले.
लीनाज् 1 ग्रॅम ज्वेलरीकडून कार्यक्रमातच थेट कस्तुरी क्लबचे सदस्य होणार्‍यांना एक ग्रॅम सोन्याच्या बांगड्या मोफत देण्यात आल्या.
कार्यक्रमासाठी कस्तुरी सदस्या दुपारी अडीचपासूनच नऊवारी साडी आणि मराठमोळी पारंपरिक वेशभूषा करून उपस्थित होत्या.

’पुढारी कस्तुरी क्लब’सोबत गेल्या वर्षापासून जोडलेलो आहोत. कार्यक्रमात कस्तुरी सभासद मोठ्या संख्येने सहभागी होतातच. पण, ’अप्सरा आली’ या कार्यक्रमातील लक्षणीय आणि उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता यापुढील काळात अनेक कार्यक्रमांत आमचा असाच पाठिंबा राहील.
                             – विजय मोरे, मार्केटिंग हेड, मुंबई ऑन्कोकेअर सेंटर, पुणे

’पुढारी कस्तुरी क्लब’ सभासद महिलांचे लीनाज् 1 ग्रॅम ज्वेलरी हे प्रथम पसंतीचे हक्काचे ठिकाण झाले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे जाणवले, याचा विशेष आनंद होत आहे. भविष्यात कस्तुरी क्लबच्या कार्यक्रमाला आमचा असाच पाठिंबा राहील.

                  – लीना मुंडलिक, व्यवस्थापकीय संचाचक, लीनाज् 1 ग्रॅम ज्वेलरी

’पुढारी कस्तुरी क्लब’च्या या कार्यक्रमात सहभागी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग बघून खूप आनंद झाला. भविष्यात कस्तुरी क्लबसोबत कार्यक्रम करायला आम्हाला नक्की आवडेल.

                                               – डॉ. रवींद्र बर्वे, व्यवस्थापकीय संचालक, अ‍ॅस्ट्रोहब

’पुढारी कस्तुरी क्लब’च्या सगळ्या ’कस्तुरीं’चा सहभाग उल्लेखनीय होता. कस्तुरीसाठी भविष्यात अजून नवनवीन कार्यक्रम नक्कीच करू.

                – वैभव पाटसकर आणि क्रांती खांडरे, व्यवस्थाकीय संचालक, कॅशनेटर

Back to top button