मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई महापौर मुंबईतील महापालिका व खाजगी शाळेमधील आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास पालिका शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे. मात्र केईएम हॉस्पिटलमधील कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतलेल्या डॉक्टरांना कोरोना संसर्ग झाल्यामुळे शाळा सुरू करायच्या की नाही, याबाबत शिक्षण विभाग संभ्रमात सापडला आहे.
दरम्यान शुक्रवार १ ऑक्टोबरला महापौर स्वतः पालकांशी संवाद साधून शाळा सुरू करण्याबाबत त्यांचे मत जाणून घेणार आहेत.
मुंबई शहरातील महापालिका व खाजगी शाळांचे इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्याबाबतचे परिपत्रक बुधवारी रात्री पालिकेच्या शिक्षण विभागाने प्रसिद्ध केले. त्यामुळे तब्बल पाच लाखापेक्षा जास्त विद्यार्थी आपल्या घराबाहेर पडणार आहेत.
शाळांमध्ये राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन होणार असले तरी, शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी एकत्र येऊन त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
केईएम हॉस्पिटलमधील तब्बल २९ डॉक्टरांना कोरोना प्रतिबंध लसीचा दुसरा डोस घेऊनही संसर्ग झाला. काही डॉक्टरांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करावे लागले. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस न घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
शहरात एकाच वेळी पाच लाखापेक्षा जास्त विद्यार्थी बाहेर पडणार असल्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान महापालिकेने शाळा सुरू करण्याच्या घेतलेल्या या निर्णयावर पालकांचे मत महापौर किशोरी पेडणेकर जाणून घेणार आहेत.
शुक्रवार १ ऑक्टोबर दुपारी २ वाजता व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे महापौर पालकांची संवाद साधणार आहेत. यात ५०० पेक्षा जास्त पालक सहभागी होतील, असे महापौर कार्यालयाकडून सांगण्यात आले.
पालकांनी शाळा सुरू करायच्या की नाही, याबाबत आपले मत नोंदवल्यानंतरच ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.